शिर्डी (शहर प्रतिनिधी) -

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्या बदललेल्या दर्शन व्यवस्थेमुळे प्रत्येक भक्तांना ऑनलाईन दर्शन पास अनिवार्य झाला असून या

व्यवस्थेच्या माध्यमातून संस्थानच्या तिजोरीत दानाची वाढ झाली आहे. बायोमेट्रिक दर्शन पास देणारी संबंधित कंपनी देखील यामुळे चांगलीच नफ्यात आली आहे. या कंपनीच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली असली तरी कंपनीसाठी काम करणार्या कर्मचार्यांचे तिन महिण्यांपासून खिसे रिकामे राहिले. त्यामुळे कर्मचार्यांचे आर्थिक बजट कोसळल्याने कंपनी तुपाशी आणि कामगार उपाशी असे चित्र बघावयास मिळत आहे.

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने बायोमेट्रिक दर्शन पासेसची योजना शताब्दी महोत्सवापुर्वी साईबाबा संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी अंमलात आणली आहे. बायोमेट्रिक दर्शनपास व्यवस्था सुरवातीपासून भाविक शिर्डी ग्रामस्थ यांच्या टिकेचा केंद्रबिंदू ठरली आहे. बायोमेट्रिक दर्शन पासेसच्या माध्यमातून एका पाससाठी केंद तसेच राज्य सरकारकडून जाहिरातीपोटी एक रूपया सत्तर पैसे कंपनीला प्राप्त होत असल्याचे त्रिलोक कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

करोना महामारीपुर्वी साई मंदिरात दिवसाला कमीतकमी तिस ते पस्तीस हजार भाविक दर्शन घेत होते. गुरूवारी, शनिवारी, रविवारी व उत्सवाच्या दिवशी हा आकडा लाखाच्या आसपास पोहचत होता. मात्र कोव्हिडनंतर साईमंदीर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी राज्य सरकारने नियमावलीनुसार आदेश पारीत केले. दि. 16 नोव्हेंबरपासून साई मंदीर सुरू झाले. अडीच महिण्यात बारा लाखाहून जास्त भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतल्याचे संस्थान प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. एका दिवसाला बायोमेट्रिक दर्शनपास आकडेवारीनुसार हिशोब केला तर किती उत्पन्न मिळत आहे. यामध्ये ऑनलाईन दर्शनपास सोडले तर बायोमेट्रिक पासच्या माध्यमातून कमीतकमी दहा लाख भाविकांनी दर्शन घेऊन त्रिलोक कंपनीला कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र गेल्या तिन महिण्यांपासून कर्मचार्यांना पगार थकवल्याने कर्मचार्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वास्तविक बायोमेट्रिक पद्धतीने काम करणार्या कंपनीने शासनाकडून आपले मानधन पदरात पाडून घेतले असेल परंतु येथे काम करणार्या गोरगरीब विद्यार्थी व कर्मचारी यांचे पगार रखडून ठेवले आहे.

असे असतांना जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणार्या साईसंस्थानने अशा कंपनी व्यवस्थापनास करारबद्ध करावे का? असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. तसे पाहिले तर संबंधित कामगारांचा साई संस्थान प्रशासनाशी काडीमात्र संबंध नाही. मात्र बेजबाबदारपणे काम करणार्या कंपनीवर संस्थान प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. याबाबत सदरील कर्मचार्यांनी संस्थानकडे तक्रार केली आहे.