शिर्डी, औरंगाबादसह देशातल्या 13 विमानतळांचं नाव बदलणार

शिर्डी, औरंगाबादसह देशातल्या 13 विमानतळांचं नाव बदलणार

औरंगाबाद | Aurangabad

शिर्डी, औरंगाबाद, कोल्हापूरसह देशातील इतर 13 विमानतळांचे लवकरच नामांतर होणार आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून येत्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

या संबंधीचा एकत्रित प्रस्ताव विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे लवकरच कॅबिनेटसमोर ठेवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाला नागरी उड्डयन मंत्रालयाने ही प्रस्तावाची माहिती दिली आहे, असे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाच्या नामांतरावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे. विमानतळ नामांतराची प्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र कालच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यासंदर्भातली विनंती करण्यासाठी केंद्रीय विमान उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटले होते. याविषयी डॉ. कराड यांना विचारले असता, खैरे यांना याबद्दल काहीही माहिती नाही. औरंगाबादसह देशातल्या 13 विमानतळांची नावं बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

5 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र मंत्री मंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com