शिर्डीतील हल्ल्यात जखमी इसमाचा मुत्यू

शिर्डीतील हल्ल्यात जखमी इसमाचा मुत्यू

आरोपी पसार; नातेवाईकांचा रुग्णालयाबाहेर ठिय्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील रहिवासी असलेल्या राजू धिवर (वय 42) या इसमावर मंगळवारी सायंकाळी चार अज्ञात हल्लेखोरांनी अंगाखांद्यावर धारदार शस्राने वार करून गंभीररित्या जखमी केले होते. उपचारादरम्यान धिवर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी आरोपींना आमच्यासमोर जोपर्यंत हजर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठामपणे भूमिका घेत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील दुहेरी हत्याकांडातील घटनेला 72 तास उलटत नाही तोच शिर्डीत 42 वर्षीय राजू आंतवन धिवर यांंना चौघा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्राने वार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. मारेकरी अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत शिर्डी पोलिसांनी फिर्यादी संजय मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरूद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं 237/2021 नुसार भादंवि कलम 302, 34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी सांगितले.

गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या राजू धिवरचा साईबाबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजताच बुधवारी सकाळी मयताच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत रुग्णालयाच्या गेटसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासन जोपर्यंत आरोपींना आमच्यासमोर हजर करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी ठोस भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शिर्डी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी येऊन मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढली. लवकरच आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले.

यानंतर नातेवाईकांनी शांततेचा अवलंब करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तसेच अन्य ठिकाणाहून पथके तैनात केले आहे. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार संजय पवार यास अधिक विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच दिवशी घटनेच्या मध्यरात्री त्याच्या घराचा दरवाजा अज्ञातांनी ठोठावल्याची माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी महिलेने केली आहे.

यावेळी सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दातरे, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रुपवते आदींसह फौजफाटा उपस्थित होता. तसेच मोठ्या प्रमाणावर नातेवाईक तसेच डॉ. आंबेडकरी चळवळीतील शिमोण जगताप, नितीन शेजवळ, चांगदेव जगताप आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक श्री. दातरे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com