शिर्डी विमानतळावर नोकरी लावून देतो म्हणत 55 लाख रुपयांची फसवणूक

सिन्नर तालुक्यातील तीन तरुणांना अटक
शिर्डी विमानतळावर नोकरी लावून देतो म्हणत 55 लाख रुपयांची फसवणूक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी विमानतळावर चांगल्या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून डिसेंबर ते मे या सहा महिन्यांच्या काळात बीड पाथर्डी या ग्रामीण भागातील 11 तरुणांकडून प्रत्येकी 5 लाख रुपये घेऊन जवळपास 55 लाख रुपये गोळा करून आर्थिक फसवणूक केली. बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केली. अशी फिर्याद चंद्रकांत विठ्ठलराव जाधवराव, रा. बीड यांनी शिर्डी पोलिसात दिली.

फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या मुलासह 11 मुलांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन तुम्हाला शिर्डी-साईनगर विमानतळ शिर्डी येथे नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले. पैसे देखील घेतले.लवकरच नियुक्तीपत्र देतो असे सांगत आज, उद्या देतो, असे आश्वासन दिले. मोठा पाठपुरावा केल्यानंतर शिर्डी साईनगर विमानतळाच्या नावाने डुब्लीकेट रंगीत तयार केलेली बनावट लेखी नियुक्तीपत्र देखील विमानतळाच्या नावाने या तरुणांना दिले.

त्यानंतर सदर तरुणांनी याबाबत शिर्डी येथे येऊन विमानतळावर नोकरीवर हजर होण्यासाठी प्रयत्न केला असता आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. त्यामुळे झालेल्या फसवणुकीबाबत यातील एका उमेदवाराने झालेला प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत फसवणुकीची तक्रार शिर्डी पोलिसांत दाखल केली.

आरोपींविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 433/22 भादंवी 420, 465, 468, 471, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची दखल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे यांनी सुरू केला. या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी गोकुळ राजाराम कांदे, रा.तामसवाडी, तालुका निफाड ,जिल्हा नाशिक, गोकुळ ठकाजी गोसावी रा. मलढोण तालुका सिन्नर, विलास रामचंद्र गोसावी रा. मलढोण, ता. सिन्नर, जिल्हा-नाशिक या तीन तरुणांना अटक करण्यात आली. त्यांना राहाता न्यायालयापुढे हजर केले असता नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com