शिर्डी विमानतळावर हज हाऊस उभारण्याची मागणी

शिर्डी विमानतळावर हज हाऊस उभारण्याची मागणी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जगाला सबका मालिक एक संदेश देणार्‍या श्री साईबाबांच्या आंतरराष्ट्रीय शिर्डी विमानतळावर हज हाऊस उभारण्यात यावे, अशी मागणी शिर्डीतील काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख आणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य शब्बीरभाई सय्यद यांनी ऑल इंडिया उलमा बोर्डचे जनरल सेक्रेटरी अजर खान व वारीस अली यांना निवेदनाद्वारे केली आहे.

ऑल इंडिया उलमा बोर्ड यांच्यावतीने देशाची राजधानी दिल्ली येथे न्याय आणि शांतीसाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद 2021 चे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी हजरत मौलाना खलीलूरहेमान सज्जाद नोमाणी तसेच इंडिया इस्लामिक कल्चरचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराजूद्दीन कुरेशी आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशातील मुस्लिम समाजातील सुमारे 300 प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहर कार्याध्यक्ष समीर शेख तसेच भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य शब्बीरभाई सय्यद यांना आमंत्रित केले होते.

यावेळी समिर शेख व शब्बीरभाई सैय्यद यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांच्या शिर्डीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पुणे, औरंगाबाद, धुळे, मालेगाव, अहमदनगर येथील मुस्लिम बांधवांना हज यात्रेला जाण्यासाठी मुंबईत जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणावरून मुस्लिम बांधवांना हज यात्रेला जाण्यासाठी सोयीस्कर होईल यासाठी शिर्डी विमानतळावर हज हाऊस होणे गरजेचे आहे. यासाठी शिर्डी योग्य ठिकाण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. शिडीॅत हज हाऊस व्हावे तसेच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, स्थानिक खासदार व आमदार यांची भेट घेणार असल्याचे समीर शेख यानी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com