शिर्डी विमानतळ विकासकामांसाठी 300 कोटी देणार

आ. काळे यांच्या मागणीवरून आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
शिर्डी विमानतळ विकासकामांसाठी 300 कोटी देणार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच देशविदेशातून येणार्‍या साईभक्तांच्या दृष्टीने व काकडी व पंचक्रोशीतील गावांचा विकास होण्यासाठी

आवश्यक असणारी सुधारीत विकासकामे व्हावीत यासाठी बैठक घ्यावी या आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीवरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिर्डी विमानतळासाठी 300 कोटी रुपये उपलब्ध करून देवू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार सोमवारी काकडी विमानतळाच्या विविध समस्या व विकासकामांबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत आ. काळे यांनी काकडी-शिर्डी विमानतळाच्या विविध समस्यांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यामध्ये शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळारून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी बी.सी.ए.सी. यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहे. त्यास शासनाने शिफारस देवून सल्लागार समिती नेमून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घ्यावा. कार्गोसेवा व विमानतळ विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील जमीन नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादन करून शेतकर्‍यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा.

देशविदेशातून शिर्डी विमानतळावर येणार्‍या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून रात्रीची उड्डाणे सुरू करावीत. रन-वे वरील पाणी नैसर्गिक उताराप्रमाणे काकडी येथील पाझर तलावात सोडण्यासाठी निधी मिळावा. विमानतळाच्या बाहेरील बाजूने सर्विलन्स रोड तयार करण्यात यावे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ख-ढ कोड सध्या ड-ॠ आहे त्यात बदल करून ड-ख (साई) करण्यात यावा. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करण्यात यावे.

विमानतळासाठी आलेल्या पाण्यातून काकडी, मनेगाव व रांजणगाव या तीन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. काकडी गावातील गावठाणअंतर्गत रस्ते व अंतर्गत गटारीचे तसेच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उर्वरित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावे. स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना रोजगारांमध्ये प्राधान्य द्यावे. कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. काकडी गावातील शेतीसाठी विमान प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 24 तास वीज देण्यात यावी.

विमानतळावरील विविध कामांचे टेंडर स्थानिकांना देण्यात यावे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने 2016 -17 पासून थकवलेली मालमत्ता कराची रक्कम तातडीने भरण्यात यावी अशा अनेक महत्वाच्या रखडलेल्या समस्यां आ. काळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यापुढे मांडल्या. या मागण्यांचा ना. पवार यांनी गांभीर्याने विचार करून सर्व मागण्यांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी सांगितले असे शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी सांगितले.

बैठकीसाठी आमदार आशुतोष काळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, वित्त विभाग सचिव मित्तल, महसूल व वन विभागाचे मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभाग प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, व व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री, सहाय्यक वनसंरक्षक देवखळे यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com