रांजणगाव देशमुख (वार्ताहर) -

शिर्डी विमानतळाच्या सीआय एसएस मधील एकवीस कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. साईभक्तांच्या सोयीसाठी काकडी येथील शेतकर्यांनी जमिनी

दिल्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना नोकर्या व इतर आश्वासने दिली. कायमस्वरुपी नोकरी ऐवजी काहींना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतले. त्यातील सीआयएसएस मधील 21 कर्मचार्यांना अचानक कमी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

विमानतळासाठी जमिनी घेताना नोकरी देण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना देण्यात आले होते. त्यावेळी कामगारांना कंत्राटी कामावर घेण्यात आले होते. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता या 21 कर्मचार्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. हे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची मुले आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या जमिनी घेताना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते तर मिळालेच नाही. परंतु कंत्राटी कामावर घेऊन तेही आता काढून टाकले. त्यामुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. अनेक दिवसांपासून हे कामगार याठिकाणी काम करत आहेत. जमीनही गेली नोकरीही गेली. आता काय करायचे असा प्रश्न या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांपुढे उभा राहिला आहे. दिलेले आश्वासन पूर्ण करणे तर दुरच मात्र कंत्राटी नोकरी गमावण्याची वेळ या शेतकरी पुत्रांवर आली आहे. परिसराचा विकास करू,अशा आश्वासनावर जमिनी घेतल्या आतातर नोकरीवरून काढून टाकले जात आहे. आम्हाला पुन्हा कामावर सामावून घ्या, अशा मागणीचे निवेदन शेतकर्यांच्यावतीने प्रकल्पग्रस्त प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेचे संस्थापक कानिफनाथ गुंजाळ यांनी काकडी विमानतळ व्यवस्थापकीय संचालक दीपक शास्त्री यांना दिले आहे. निवेदनावर कमी करण्यात आलेल्या डी. डी भालेराव, ए.सी गुंजाळ, एस.सी ढवळे, एस.टी भालेराव, एस.एल सोनवणे, आर एम .सोनवणे, एस.डी सोनवणे, पी.एफ सोनवणे, बी.बी सोनवणे, बी.बी गुंजाळ, आर.सी गोसावी,पी.पी गोसावी, एन.एच शेख,.एस.डी ढवळे, ए.एम गांगुर्डे, के.एस मोरे, एस.एस गुंजाळ, वाय.एस डांगे, एस बी सोनवणे, एन.ए आरणे, व्ही.एच मोरे या कामगारांच्या सह्या आहेत.नोकरीवर नाही घेतलं तर लवकरच विमानतळाच्या गेटवर आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार असल्याचे या कामगारांनी यावेळी सांगितले.

सी.आय.एस एसचा विमानतळाशी असलेला कराराचा कालावधी संपल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सुचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. नविन नविन तंत्रज्ञान येत आहे. ह्या जागा तात्पुरत्या स्वरुपाच्याच होत्या ही कल्पना त्या कामगारांना दिली होती. ज्यांच्याकडे क्वालीफीकेशन होते त्या अनेकांना इतर ठिकाणी संधी दिली आहे. या कामगारांना कामावर सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी वेळ लागेल.त्या कामगारांबद्दल आमची सहानुभुती होती आणि राहणार आहे.

- दीपक शास्त्री, संचालक, शिर्डी विमानतळ.