
शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे काल भर दुपारी विजेच्या तारा एकमेकांना घासून शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक झाला. शिरसगाव येथील सुमन रामदास गवारे यांच्या गट क्र. 139 मधील दोन एकर क्षेत्रातील उभ्या उसास वीज तारांमुळे घर्षण होऊन शॉर्टसर्किटने उसास आग लागून खाक झाला.
या आगीत गवारे यांचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी दोन वेळा या भागात शॉर्टसर्किट झाले परंतु वेळेवर लक्ष दिल्याने नुकसान टळले. सध्या उन्हाचे दिवस असल्याने तारा गरम होत असून त्या एकमेकांना चिकटू नये याची महावितरणने योग्य दक्षता घेतली पाहिजे. महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकर्यांना विनाकारण नुकसान सोसावे लागत आहे. सध्या ऊस तोड लवकर होत नसल्याने आधीच गंभीर प्रश्न झाला आहे. उसाला आग लागल्याबरोबर अग्निशामक दोन बंब तातडीने आले.
तोपर्यंत पूर्ण ऊस जळाला होता. याची महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे. वेळेवर वायरमन व दूरध्वनी सेवेचे संतोष काटे व सहकारी शिवा बर्डे आदींनी येऊन वीजपुरवठा, दूरध्वनी सेवा सुरळीत करण्यात आली. महावितरण अधिकारी यांनी यापुढे सर्वत्र दक्षता घेऊन अशा घटना टाळाव्यात व तारांमध्ये आवश्यक गार्डीयन त्वरित टाकावेत, अशी मागणी होत आहे.