ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शिरसगावात बैठकांना प्रारंभ

सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शिरसगावात बैठकांना प्रारंभ

शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने विखे, मुरकुटे, आदिक गटाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान तारीख निश्चीत झाल्याने अनेक दिवसांपासूनची प्रतिक्षा संपली आहे. जनतेतून सरपंच निवड असल्याने ते पद महिला अनुसूचित जातीसाठी असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. अनुसुचीत जाती महिलेस सरपंचपद असल्याने इच्छुक उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला आहे.

शनिवारी गावातील सर्व प्रभागातील मतदारांची बैठक गणेशराव मुदगुले यांनी घेऊन मतदारांशी चर्चा करून योग्य प्रतिनिधित्व करणारे उमेदवार उभे केले जातील. त्याची चाचपणी सुरु केली. आता ना. राधाकृष्ण विखे पाटील गट, अविनाश आदिक गट व माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा गट अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता वाटते. गावच्या विकासाच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोणता पक्ष कोणाशी युती करतो व दुरंगी लढत कशी होईल हे पण पाहण्याचे गरजेचे आहे. अनेक इच्छुकांनी तयारी सुरु केल्याने ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार आहे. ना.राधाकृष्ण विखे पाटील गटाचे नेतृत्व गणेशराव मुदगुले, युवा नेते अविनाश आदिक गटाचे नेतृत्व किशोर पाटील तर माजी आ.भानुदास मुरकुटे गटाचे नेतृत्व आबासाहेब गवारे हे करणार आहेत.

सध्या प्रशासक राज असल्याने अनेक अडचणी येत होत्या. मुदत संपल्याने अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. निवडणूक लांबणीवर पडत होती. मागील आठवड्यात मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. शिरसगाव ग्रामपंचायतीसाठी एकूण 6 प्रभाग असून प्रभाग 1 मध्ये 1008, प्रभाग 2 मध्ये 725, प्रभाग 3 मध्ये 1037, प्रभाग 4 मध्ये 867, प्रभाग 5 मध्ये 1190 तर प्रभाग 6 मध्ये 1209 असे एकूण 6006 चे मतदार आहेत.

प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुष, 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, प्रभाग 2 साठी सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष 1, नागरिक मागास प्रवर्ग स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग 3 मध्ये अनु.जाती स्त्री किंवा पुरुष 1, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, प्रभाग 4 अनुसूचित जातीसाठी स्त्री किंवा पुरुष 1, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, अनु.जाती स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग 6 सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष 1, अनु.जाती स्त्री 1,अनु.जमाती स्त्री 1 असे 17 सदस्य व सरपंच पदासाठी एक अशा 18 जागा आहेत.

दरम्यान, दि. 16 ते 20 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल, दि. 25 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख, दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com