शिंगणापूरला चौथऱ्यावर करता येणार तेल अभिषेक

शिंगणापूरला चौथऱ्यावर करता येणार तेल अभिषेक

सोनई (वार्ताहर)

शनीशिंगणापूर ता. नेवासा येथे राज्यासह देशभरातून व परदेशातूनही भाविक श्री शनैश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.

वर्षभर भाविक भक्तांचा मोठा ओघ शनिशिंगणापूरला असतो. गेल्या अनेक दिवसांपासून शनी भाविकांची चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा, ही मागणी होती. यानुसार श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी शनिवार दि. १८ जूनपासून परवानगी दिली आहे.

ज्या भाविकांना शनीदेवास तेल अभिषेक करावयाचा असेल अशा भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची ५०० रु. ची देणगी पावती घेऊन शनी चौथऱ्यावर अभिषेक करता येईल. हे तेल अभिषेक पावतीकरीता भाविकांनी देवस्थानचे तेल विक्री काउंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले आहे.

राज्यासह देशभरातील अनेक देवस्थानमध्ये भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पेड पासेस दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच धर्तीवर शनीभक्तांच्या मागणीचा विचार करून शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला आहे. त्याचे शनीभक्तांमधून स्वागत होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com