
शेवगाव (शहर प्रतिनिधी)
शेवगाव तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये ठिकठिकाणी पान, मावा, गुटखा, तंबाखू युक्त सुपारी, खाऊन त्याच्या पिचकार्या मारल्याने अनेक ठिकाणी इमारतीचे विद्रुपीकरण झालेले आहे. इमारतीचा प्रत्येक कोपरा पिंकदानी झाला असून बाहेरून कामासाठी येणार्या नागरिकांसह कर्मचारीही येथे पिचकार्या मारत असल्याचे चित्र आहे.
पिण्याचे पाणी सार्वजनिक स्वच्छतागृह कार्यालयाच्या अनेक ठिकाणी भिंतीची दुर्दशा सुरू असल्याचे चित्र जागोजागी पाहण्यास मिळत आहे. या इमारतीकडे संबंधीतांचे लक्ष नसल्याने या टुमदार इमारतीची दुर्दशा झाली आहे. याठिकाणी कामे घेऊन येणारे नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, इमारतीची साफसफाई, तसेच या ठिकाणी घाण करणार्यांवर कारवाईचा बडगा उघडण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव शहर अध्यक्ष प्रीतम गर्जे यांनी केली आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा निर्धार तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख व गर्जे यांनी केला आहे. शहरातील अमरापूर, पाथर्डी हमरस्त्यावर तहसील कार्यालय बरोबरच तालुका कृषी विभाग, सहाय्यक निबंधक दुय्यम निबंधक यांच्यासह तलाठी, सेतू असे विविध शासकीय कार्यालयाचे कामकाज एकाच छताखाली सुरू आहे. मात्र, तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये विविध ठिकाणी दर्शनी भागातील भिंतीवर पान तंबाखूच्या पिचकारी मारल्याने या इमारती विद्रुपीकरण झाले आहे. पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या परिसराची दयनीय अवस्था झाली असून सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोडतोड झाल्याने त्याचा उग्र वास परिसरात पसरून अनेकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.