शेवगाव तालुक्यातील राजकारणी कुपमंडूक वृत्ती केव्हा सोडणार?

शेवगाव तालुक्यातील राजकारणी कुपमंडूक वृत्ती केव्हा सोडणार?

शेवगाव तालुका वार्तापत्र | सुनील आढाव

शेवगाव नगरपरिषद व पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुका नवीन वर्षात होणार आहेत. यामुळे संबंधित इच्छुकांनी दीपावलीचे निमित्त साधत मतदारांशी जवळीक साधण्यासाठी भेटीगाठी, भेटवस्तू, भोजनावळी सुरू केल्या आहेत. काही इच्छुक तर संधी मिळेल तेथे आवर्जून उपस्थिती लावत आहेत. तालुका पातळीवरील राजकीय पदाधिकार्‍यांनी संबंधित प्रभाग, गट, गण यांचाच विकास साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते नजरेतून सुटले नाहीत. मात्र संपूर्ण तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचे कोणालाच काही देणेघेणे दिसत नसल्यासारखी स्थिती आहे. यामुळे राजकारण्यांची कुपमंडूक वृत्ती कधी संपणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

दीपावली सण तालुक्यात काही कुटुंबात उत्साहात, पूरग्रस्तांचा आर्थिक विवंचनेत तर करोनामुळे मृत झालेल्या कुटुंबात प्रियजणांच्या आठवणीमुळे दुःखात साजरा झाला. तर राजकीय पदाधिकारी विकास कामांचे अ‍ॅटमबॉम्ब धुमधडाक्यात वाजविण्याऐवजी आगामी निवडणुकांच्या धोरणातून लोकांच्या भेटी, वेगवेगळ्या उद्घाटनांच्या माध्यमातून लवंगी शाब्दिक फटाक्यांचे फुसके बार करत लोकांशी लोभ वाढविण्याचा प्रयत्न करत दीपावली साजरी करत आहेत. तालुका पांढर्‍या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो.

मात्र दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जोमात असलेल्या पांढर्‍या सोन्याची झळाळी धुळीस मिळाली. शेकडो हेक्टर क्षेत्रातील कपाशी, तूर, बाजरी, ऊस पीके वाहून गेली तर शेतात पाणी साचल्याने उभी पीके सडून गेली. आर्थिक आधार देणारी शेकडो दुभती जनावरे पुरात वाहून गेली. पंचनामे झाले. मात्र मदतीसाठी केवळ वाट पाहण्याची वेळ आली. यामुळे पूरग्रस्त कुटुंबात दीपावली काळातही आर्थिक विवंचनेचा धोक्याचा दिवा कर्त्या माणसांना अस्थिर करत होता. मदत जाहीर झाल्यावर कोणामुळे मिळाली ? याची चढाओढ भाजपा व राष्ट्रवादीत लागली आहे.

तालुक्यातील नगर, नेवासा, पैठण, पाथर्डी या प्रमुख रस्त्यांवरील खोल - खोल खड्ड्यांच्या मालिका पार करताना होणार्‍या दमछाकीतून येथे लोकप्रतिनिधी - प्रशासन आहे की नाही असा प्रश्न प्रवाशांना पडला तर नवल वाटू नये. शेवगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे व उडणारे धुळीचे लोट, शहराला 8 - 9 दिवसांतून एकदा होणारा पाणीपुरवठा, ऐन दिवाळीतही विविध प्रभागांत बिगर दिव्यांचे उभे खांब , केरकचर्‍यांचे ढीग हे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न कोण व कधी सोडवणार ? हा प्रश्न नागरिकांना सातत्याने सतावत आहे. सत्ताधारी व विरोधक फक्त एकमेकांवर टीका - टिपण्णी करण्यात धन्यता मानताना दिसतात.

तालुक्यातील राजकारण्यांनी गल्ली विकासाच्या कामावर समाधान न मानता तालुका विकासासाठी प्रयत्न करावेत. शेतीच्या पाण्यासाठी ताजनापूर लिफ्ट, शेवगाव - पाथर्डी शहर व इतर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना, मिनी एमआयडीसी आदी प्रकल्पांसाठी प्रयत्न करावेत. असे प्रकल्प प्रत्यक्षात उभे राहिले तर मतदारांशी जवळीक साधण्यासाठी फिरण्याची वेळ येणार नाही तर मतदारच संबंधितांच्या जवळ येतील.

शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य ऐन दिवाळीत लाभार्थ्यांपर्यंत न पोहचल्याने तालुक्यातील गरिबांच्या दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरले. 124 स्वस्त धान्य दुकानांपैकी 30 दुकानांना माल मिळाला तर 94 दुकानांना शासकीय मालाचा पुरवठा न झाल्याने तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांची दिवाळी महागाईमुळे दिवाळे काढणारी ठरली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com