पावसाने दडी मारल्याने शेवगाव तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त

दुबार पेरणीनंतरही पिके कोमेजू लागली
पावसाने दडी मारल्याने शेवगाव तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव परिसरासह तालुक्यात गेल्या महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. सध्या विविध पिके जोमात असताना पाउस लांबल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पाउस गायब झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली असून पावसाच्या लहरीपणाचा शेती व शेतीच्या अर्थकारणाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. एकीकडे पावसात पडलेला मोठा खंड तर दुसरीकडे खते, बियाणे, विविध औषधांच्या वाढत्या किंमती अशा एक नी अनेक संकटावर मात करून केलेली पेरणी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. तालुक्याच्या विविध भागात जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाउस झाला. शेतकर्‍यांनी मशागतीनंतर महागामोलाची बियाणे, खते खरेदी करून विविध पिकांची पेरणी केली.

अधून मधून पाउस सुरु असल्याने पिकांची समाधान कारक वाढ होत राहिली. मात्र सध्या कापूस, बाजरी, मुग, तूर, उडीद, मका अशी विविध पिके वाढीच्या अवस्थेत असतांना पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी पुरता अहवालदिल झाल्याचे चित्र तालुक्याभरात पहावयास मिळत आहे. तालुक्याचा बोधेगाव, चापडगाव, लाडजळगाव,गोळेगाव, नागलवाडी, वरखेड हसनापूर, कोळगाव, मंगरुळ, अंतरवाली, शिंगोरी, राणेगाव, बेलगाव, आधोडी, दिवटे असा बहुतांशी परिसर कोरड वाहू आहे.

या पट्ट्यात खरीप हंगाम महत्वाचा मानला जातो. या परिसरात जल सिंचन सुविधा मर्यादित स्वरूपात असल्याने या परिसरातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या लहरीपणाचा सर्वात मोठा फटका या भागातील शेतकर्‍यांना कायमच सहन करावा लागतो. तसेच दहीगाव, शहरटाकळी , मठाचीवाडी हा परिसर बागायती पट्ट्याचा असून या परिसरातील चारा, उपचार्‍याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याच्या तक्रारी आहेत.

कृषी विभागाचे दुर्लक्ष व खत कंपनीच्या मनमानी कारभारामुळे खतावरील लिंकिंगचा भार शेतक-यांना सहन करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकांसाठी झालेला खर्च कसा काढायचा याची शेतकर्‍यांना चिंता असून बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावयाची याची चिंता लागल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

आवर्तनाची शक्यता दूसर

पुरेसा पाउस नसल्याने ओढे, नाले, बंधारे, सध्या कोरडे ठाक असून हाताशी आलेले पिक निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पाटाला पाणी सुटले तरी परिसरातील सर्वच गावात त्याचा लाभ मिळण्याची खात्री नसल्याने व पाट पाण्याचे आवर्तन सध्यातरी सुटण्याचे चिन्हे नसल्याने बागायती पट्ट्यातील शेतकरी सुद्धा पाउस लांबल्याने चिंतेत सापडले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com