शेवगाव तालुक्यासाठी 75 कोटी अपेक्षीत मदत निधीची मागणी

94 गावांतील 49 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
File Photo
File Photo

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला असून तालुक्यातील 94 गावांतील 49 हजार 018 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून याच्या नुकसान भरपाईपोटी एकूण 74 कोटी 50 लाख 40 हजार 800 रुपये अपेक्षीत मदत निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव व ढोरजळगाव अशा पाच मंडळांत अतिवृष्टीमुळे कपाशी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, मका, तूर, भुईमूग आदी पिके बाधित झाली असून 68 हजार 56 शेतकर्‍यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यासाठी 66 कोटी 66 लाख 44 हजार 800 रुपयांचा अपेक्षित निधी. तसेच एरंडगाव मंडलातील 19 गावांत सतत पावसामुळे 5 हजार 985 हेक्टर क्षेत्रातील विविध पिके बाधित झाली असून 11 हजार 278 शेतकर्‍यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यासाठी 8 कोटी 13 लाख 96 हजार रुपये अशाप्रकारे शेवगाव तालुक्यासाठी एकूण 74 कोटी 80 लाख 40 हजार 800 रुपये अपेक्षित मदत निधी उपलब्ध करून देण्याची या अहवालात मागणी करण्यात आल्याची माहिती तहसीलदार छगन वाघ, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी महेश टकले यांनी दिली.

यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरी 737 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीचीही नोंद झाली असून शेतकर्‍यांच्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव आदी गावांचा दौरा करून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगून महसूल व कृषी यंत्रणेस शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करून तालुक्याचा अहवाल तातडीने वरिष्ठ स्तरावर सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्याचा नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वाघ यांनी दिली. तालुक्याचा नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला असून आता शेतकर्‍यांना मदत निधीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पीकनीहाय नुकसानग्रस्त क्षेत्र

कपाशी - 38 हजार 887 हेक्टर, बाजरी - 1 हजार 183 हेक्टर , सोयाबीन - 926 हेक्टर, तूर - 7 हजार 017 हेक्टर, मूग - 434 हेक्टर, उडीद - 159 हेक्टर, मका - 271 . तर 140 हेक्टर क्षेत्रातील भुईमूग आदी पिके बाधित झाली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com