शेवगाव तालुक्यात उपसरपंच पदांसाठी चुरस

आज 12 ग्रामपंचायतींमध्ये निवडी
शेवगाव तालुक्यात उपसरपंच पदांसाठी चुरस

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील मुदत संपलेल्या 12 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाली असल्याने आता उपसरपंच पदाच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. गुरूवारी (दि.29) होणार्‍या उपसरपंच निवडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक 7, भारतीय जनता पक्षाने 3, तर जन शक्ती विकास आघाडीने 1 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विजय मिळविला. असे असले तरी अनेक ठिकाणी विरोधी पक्षाची सदस्य संख्या अधिक आहे. यामुळे उपसरपंच पदाला प्रतिष्ठाला प्राप्त झाली आहे. यामुळे निवडणुका पार पडलेल्या गावात उपसरपंच पदावर कोण विराजमान होणार? या बाबत संबधित गावासह तालुक्याचेही लक्ष लागून राहिले आहे.

तालुक्यातील दहीगाव ने, खानापूर, आखेगाव, अमरापूर, जोहरापूर, रांजणी, भायगाव, खामगाव, सुलतानपूर खुर्द, रावतळे-कुरुड्गाव, वाघोली व प्रभूवाडगाव अशा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. तालुक्यातील आखेगाव, अमरापूर व खामगाव अशा तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी एका मंडळाचे सदस्य तर ग्रामपंचायत सदस्यपदी बहुतेक दुसर्‍या मंडळाचे सदस्य विजयी झाल्याने याठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

उपसरपंच पदाच्या या निवडी जनतेतून विजयी होऊून सरपंच पदावर विराजमान झालेल्या नूतन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून नियुक्त करण्यात आलेले विविध शासकीय अधिकारी निरीक्षक म्हणून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये हजर राहणार आहेत. एकदंरीत ग्रामपंचायत निवडणुका पार पडलेल्या तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या आजच्या निवडणुकीकडे संबंधित गावांसह तालुक्याचेही लक्ष लागून राहिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com