शेवगाव शहराला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा

शेवगाव शहराला दुर्गंधीयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव शहरातील नळांतून सध्या पिवळसर व दुर्गंधयुक्त वास असणारे पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे ऐन करोना संसर्गाच्या संकाटात शेवगावकरांसमोर आणखी कोणते संकट उभे राहणार यामुळे नागरिक चिंतेत आहेत. दरम्यान, या पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहेक. अन्यथा शहरात पाण्यामुळे वेगळीच लाट येण्याची शक्यता आहे.

शहरातील विविध प्रभागांना 8-9 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. कधी पिवळसर तर कधी गाळयुक्त, तर कधी दुर्गंधीयुक्त पाणी येते. मागील अनेक वर्षांपासुनचा हा भिजत पडलेला पाणी प्रश्न विधानसभा मतदारसंघ व नगरपरिषदेत पक्षीय सत्तांतर झाले तरी कोणालाही सोडवता आलेला नाही. शेवगावकरांच्या अमर्याद सहनशिलतेचा अंत सर्व संबंधित यंत्रणा किती काळ पाहणार ? हा खरा प्रश्न आहे. शहरात मागील काही दिवसांपासून नळांना पिवळसर व फेसाळलेले पाणी येत आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना हे पाणी वापरावे लागते. घरांमध्ये असलेल्या लहान, वृध्द मंडळीच्या आरोग्यावर हे दुषित पाणी परिणाम करु शकते. सर्व नागरिकांकडेच वॉटर फिल्टर नाहीत.

नळांना येणार्‍या अशुध्द पाण्याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नसते. नागरिक जेव्हा आवाज उठवतात त्यानंतर संबंधित यंत्रणा जागी होते व पळापळ करते. नळांना येणारे पाणी शहरातील काही प्रभागांना उच्च दाबाने येते तर काही ठिकाणी विद्युत पंप नळांना लावले तरी ते गुळण्या मारतात. जेथे पाणी उच्च दाबाने येते त्या प्रभागातील नगरसेवकांनी मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्याचे समजते. पाण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय उपाययोजना झालेली नाही. शेवगाव शहराला पाणी पुरवठी करणारी कालबाह्य व खिळखिळी झालेली यंत्रणा बदलुन नवीन पाणीपुरवठा योजनेची व शहरातील पाणी वितरण व्यवस्था नव्याने करण्याची गरज आहे.

मात्र, या मुलभुत प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले असते तर प्रश्न सुटला असता असा असे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून मुख्य प्रश्नावरील लक्ष विचलीत करण्याचे काम वारंवार केले गेले आणि हा आजही हा पाणी प्रश्न तसाच भिजत पडलेला आहे. निवडणुक काळात दिलेल्या मोठ्या आश्वासनांचा विसर नेते मंडळींना नंतरच्या काळात पडलेला आहे. जायकवाडी जलाशयजवळ असतांनाही नागरिकांना पाण्याची वाट पाहण्याचा मोठा त्रास अनेक वर्षांपासुन सहन करावा लागत आहे. 8-9 दिवसांतुन एकदा पाणी फक्त उन्हाळ्यात नव्हे, तर बारा महिने हेच रडगाणे शेवगावकरांच्या नशिबी आलेले आहे. शहरातील लोकसंख्या वाढ व उद्योग- धंद्याचा विचार करता हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर हा प्रश्न सुटु शकतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com