
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
शहरातील क्रांती चौकात तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने झालेल्या आंदोलनात राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते खा.संजय राउत यांच्यावर सूडबुद्धीने करण्यात आलेल्या इडीच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचाही राज्यातील मराठी बांधवांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात येऊन केंद्र व राज्य सरकारने आकस बुद्धीच्या कारवाया थांबवून जनतेच्या महत्त्वपूर्ण समस्या सोडविण्याच्या कामाला प्राधान्य देण्याची त्यांना सद्बुद्धी देवो अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. कोणी कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजपर्यंत भक्कम होती व उद्याही राहणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हा शिवसेना उपप्रमुख शिवाजीराव काटे व शहरप्रमुख सिद्धार्थ काटे यांनी दिली.
शेवगाव शहरासह तालुका, जिल्हा व राज्य भरातील सर्व शिवसैनिक खा.संजय राउत यांच्यामागे खंबीरपणे उभे असून शिवसेना वाढविण्याच्या तसेच शिवसेनेचे संघटन अधिक प्रभावी व्हावे यासाठी आम्ही करित असलेल्या कामापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर यावेळी म्हणाले. शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे, शीतल पुरनाळे, माजी जि.प. सदस्य रामजी साळवे, भारत लोहकरे, महेश पुरनाळे, महिला आघाडीच्या पुष्पा गर्जे, कोमल पवार, यांच्यासह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.