शेवगावच्या वाड्या, वस्त्यांवरील शाळा रामभरोसे

शेवगावच्या वाड्या, वस्त्यांवरील शाळा रामभरोसे

काही शाळांना कुलूप, आपसात ठरवून शिक्षकांच्या दांड्या

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या एक वा दोन शिक्षकी अनेक शाळेवर शैक्षणिक प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याने शेवगाव तालुक्याच्या ग्रामिण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण रामभरोसे झाले असल्याचे चित्र समोर आले आहे.

दुर्गम भागातील वाडीवस्तीवर राहणारे मुले शिक्षणापासुन वंचित राहू नयेत यासाठी सरकारने सन 1992 साली खडू फळा योजने अंतर्गत दुर्गम भागातील वाडीवस्तीवर वस्ती शाळा सुरु केल्या. एक विद्यार्थी ते 10 विद्यार्थी यांच्यासाठी एक किंवा दोन शिक्षकांची नेमणूक केली. या शाळांना सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कालांतराने जिल्हा परिषद, पंचायत सिमतीच्या अधिकार्‍यांचे या शाळांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अनेक वाडीवस्ती वर, लमाण तांडयावरील शिक्षकांवर तेथील भौगोलिक स्थितीमुळे नियंत्रण ठेवणे दुर्लक्षित झाले. नेमका त्याचा लाभ या शिक्षकांनी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यातील शैक्षणीक गुणवत्ता घसरली आहे.

काही शिक्षकांनी आपआपल्या सोईनुसार या वाडीवस्तीवरील शाळेत वर्णी लावून घेतली. ज्या ठिकाणी 1 ते 15 विद्यार्थी पटसंख्या आहे. त्याठिकाणी दोन शिक्षक नेमणूकीस आहेत. परंतू एकच शिक्षक शाळेत हजर असतो. दुसर्‍याचा एक दिवसाच्या किरकोळे रजेचा अर्ज त्याचे कडे ठेवलेला असतो. हे शिक्षक आठ आठ दिवसाच्या पाळ्या लावून शाळा चालवितांना आढळल आहेत. विषेश म्हणजे महिन्यातले 15 दिवसच शिक्षक हजर असतात. तर तालुक्यातील लाडजळगाव शिवारातील जय अंबीका या वस्तीशाळेवरील शिक्षकांनी तर सगळ्याच मर्यादा पार केल्या आहेत. ही एक शिक्षकी शाळा असुन आठआठ दिवस या शाळेला कुलूप असते. अशी माहीती येथील नागरीकाांनी दिली.एकूणच या कामचुकार शिक्षकांनी आणी त्यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांनी गरिबांच्या मुलांचे शिक्षण रामभरोसे केले आहे. त्यात सुधारणा व्हावी . अशी ग्रामस्थां ची मागणी आहे.

शेकटे खुर्द ही दोन शिक्षकी शाळा आहे परंतू येथे एकच शिक्षक हजर असल्याचे समजते. दुसर्‍या शिक्षकाबाबत चौकशी केली असता त्यांचे ढोरजळगाव केंद्रात समायोजन केले असल्याची माहिती मिळाली. वास्तविक पाहता बोधेगांव केंद्राअंतर्गत कोणत्याही शाळेवर समायोजन करणे आवश्यक व योग्य असतांना तालुक्याच्या दूसर्‍या टोकावर, मराठवाड्याच्या सरहद्दीवरुन थेट नगर तालुक्याच्या सरहद्दीवर असणार्‍या शाळेत समायोजन हे कोणत्या नियमात बसते. हे शिक्षण विभागालाच ठावूक. संबंधित शिक्षक नगरला राहतात म्हणून त्यांच्या सोईनुसार समायोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

आठवड्यातून तीन-चार दिवस शाळा बंद असते. संबंधित शिक्षक वेळेवर येत नाहीत. आलेच तर तासभर थांबून कुलूप लावून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत सापडले आहे. आता संबंधित अधिकार्‍याने दखल घेऊन आमची अडचण दूर करावी.

- कविता गुठे, जयअंबिका वस्ती, लाडजळगाव

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com