
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तालुका पंचायत समितीच्या टंचाई विभागाने यंदाच्या उन्हाळ्यासाठी टंचाई आराखड्यात पिण्याचा पाण्यावर सुमारे 13 लाख रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. यामध्ये आवश्यकता असणार्या गावांमध्ये टँकर सुरू करणे तसेच विहिरी अधिग्रहीत करण्याचे नियोजन आहे.
तालुक्यातील नागलवाडी व सोनविहीर या दोन गावांसाठी टेंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आल्यास एक टेंकर उपलब्ध करण्यात येवून त्यासाठी सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च तसेच तालुक्यातील सोनविहीर, नागलवाडी, सेवानगर तांडा गावठान, गोळेगाव व सोनेसांगवी अशा सहा ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहन करण्याचा प्रस्ताव असून यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च तसेच शेवगाव, राक्षी व चापडगाव येथील उद्भवातून पाणी उचलून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा विविध योजनेतून समाविष्ट गावात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सुमारे 1 लाख 75 हजार असा एकूण 13 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सध्या हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून पंचायत समितीच्या टंचाई विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार करून तो वरिष्ठ स्तरावर सादर केला आहे. मागील पाच वर्षापूर्वी तालुक्यातील टंचाईग्रस्त 52 गावात 69 टेंकर द्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागता व त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून सुमारे 10 ते 11 कोटी रुपयांची रक्कम खर्ची पडल्याची नोंद असतांना मागील तीन वर्षात टँकर संख्या निरंक राहिली आहे.
यंदा तालुक्याची जीवन रेखा म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी जलाशयात जवळपास 100 टक्के पाणी साठा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या तालुक्यातील लाभ धारक गावांना मुबलक पाणी मिळत राहिल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण संपुष्टात आली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी पूर्वी शासकीय तिजोरीतून खर्ची पडणारा कोट्यावाधीचा खर्च आता काही लाखापर्यंत खाली आला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा सुकाळ जाणवण्याची शक्यता तालुका पंचायत समितीच्या टंचाई आराखड्यातून आज तरी स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील टंचाई खर्च
सन 2015 - 16 मध्ये टंचाई ग्रस्त 52 गावात 69 टँकरवर सुमारे 10 कोटी रुपये, सन 2016-17 मध्ये सहा गावात 9 टँकरवर 9 लाख रुपये, सन 2018-2019 मध्ये 50 गावात 69 टँकर वर 12 कोटी रुपये व 2019-2020 मध्ये तीन गावात 4 टँकर साठी 7 लाख रुपये असा खर्च झाला. मात्र सन 2017-18 तसेच सन 2020-2021 व त्यापाठोपाठ 2021-22 मध्ये टँकर संख्या निरंक राहिली.