शेवगाव शहराबाबत राज्यकर्त्यांकडून निराशाच

विकासपासून वंचित शहर ओळख पुसणार कधी?
शेवगाव शहराबाबत राज्यकर्त्यांकडून निराशाच

शेवगाव | Shevgav

गावात अंतर्गत व बाह्य रस्त्यांची झालेली दुरावस्था, प्रमुख रस्त्यावरून ठिकठिकाणी वाहणारे सांडपाणी, रस्तोरस्ती साचलेले कचर्‍याचे ढीग, प्रमुख चौकासह अनेक ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पार्किंग अभावी गर्दिच्या ठिकाणी उभी राहिलेली अस्ताव्यस्त वाहने, 15 दिवस न मिळणारे पिण्याचे पाणी अशा समस्यांनी ग्रस्त सुमारे 40 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या तालुक्याचे शहर असलेल्या शेवगावची आजची ओळख म्हणजे विकासापासून वंचित राहिलेले बकाल शहर अशी झाली आहे. शेवगाव शहराबाबात सर्वच राज्यकर्त्यांकडून निराशा झाल्याचा सुरू नागरीकांमधून उमटत आहे.

पूर्वी शेवगाव ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना किमान 4 ते 5 दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. सध्या नगरपरिषदेच्या कार्यकाळात 10 ते 12 दिवसापर्यंत वाढला आहे. शहरापासून जायकवाडी जलाशय अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही पाण्याच्या दुर्भिष्याामुळे नागरीकांकडून सदासर्वकाळ पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रता कमी होवून जनतेला दिलासा मिळावा यासाठी शहरानजीकच्या खंडोबा माळ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून 6 इंची पाईपलाईनद्वारे शहरातील जुन्या पाणी साठवण टाकीपर्यंत तातडीची योजना आखण्यात आली होती.

परंतु पावसाळा तोंडावर आला असतानाही ही योजना अजूनही कार्यान्वित झालेली नसल्याने संबधितांच्या उरफाट्या पद्धतीच्या कामकाजाबाबत जनतेतून नाराजीच्या भावना व्यक्त होत आहे. सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहे. येत्या 7 जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असून त्यानंतर निवडणूक जाहीर होणार आहे. यामुळे इच्छुकांची धावपळ वाढल्याचे निदर्शनास येत आहे. नगरपरिषदेच्या स्थापने नंतर राष्ट्रवादी व भाजपने अडीच अडीच वर्ष नगरपरिषदेची सत्ता उपभोगली मात्र दोन्ही पक्षाच्या मात्तबराकडून शेवगावकरांच्या पदरी निराशाच आली आहे.

यामुळे पूर्वीची ग्रामपंचायत तरी बरी होती, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एकंदरीत शेवगाव शहरातील दीर्घकाळ रेंगाळलेल्या मुलभूत नागरी समस्यांच्या सोडवणुकीबाबत आता सर्वानीच या समस्यांबाबत आस्थेने लक्ष घालून ते वेळीच सोडविण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवशकता जनतेतून व्यक्त होत आहे.

आता कार्यवाहीची गरज

शेवगावच्या सर्वांगीण विकासाठी कोट्यावधीच्या विविध योजनांच्या घोषणा झाल्या आहेत. सत्ताधारी तसेच विरोधी लोकप्रतिनिधींनी याच्या श्रेयासाठी कंबर कसली. परतु या घोषणांच्या पुर्तीकडे, शहर विकासाचे चित्र साकार होण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न अपुरेच पडले आहेत. राज्यकर्त्यांमध्ये शेवगावच्या विकासाचे चित्र निर्माण होवून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होण्याबाबतच्या कार्यवाहीकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com