आम्हाला फिरण्यासाठी शेवगावमधील रस्ते करा हो...

चिमुकल्यांची आमदार, खासदारांना आर्त हाक
आम्हाला  फिरण्यासाठी शेवगावमधील रस्ते करा हो...

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

‘आम्हाला सुरक्षितरीत्या फिरण्यासाठी रस्ते तयार करा हो’, ‘रस्ता देता का खासदार, आमदार नाही तर फिरू देणार नाही तालुक्यात’, ‘रस्ते करा अन्यथा चले जाव’, ‘खड्डे बुजवू नका तर शेवगाव शहरातील व तालुक्यातील सर्व रस्ते तयार करा’ अशी घोषणाबाजी चिमुकल्यांनी करत खासदार, आमदारांना आर्त हाक दिली.

मंगळवारी (दि.1) सकाळी शेवगाव शहरामध्ये लहान मुलांनी एकत्र येऊन शेवगाव तालुक्यातील व शहरातील रस्त्या संदर्भात प्रातिनिधिक स्वरूपात गाडगे बाबा चौक येथे रस्त्यावरील खड्ड्याला कार्यसाम्राट खासदार खड्डा, व कार्यसम्राट आमदार खड्डा अशी नावे देऊन शेवगाव शहरातील खड्डे मुक्त रस्ता त्वरित करा अशी आर्त हाक दिली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिल सदस्य कॉ.संजय नांगरे व त्यांची तीन वर्षांची मुलगी गौतमी नांगरे हिच्यासह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करून सोडून दिले.

शेवगाव शहरातील व तालुक्यातील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेला शहाणे लोक कंटाळले असून शाळकरी चिमुकल्यांनी आंदोलन करून आमदार, खासदारांनी रस्ते करावेत. मगच मतदार संघात फिरावे, अशा पद्धतीच्या घोषणा चिमुकल्यांच्यावतीने देण्यात आल्या. यावेळी गौतमी नांगरे, युवराज दुसंग, शैलेश तिजोरे, आरव तिजोरे, सुयश मगर, साई केमसे, श्रद्धा केमसे, राजनंदिनी फुंदे, यश फुंदे, अमन विश्वकर्मा, पूजा विश्वकर्मा, काजल विश्वकर्मा, सुरज नांगरे, गौरव नांगरे, साईराज नांगरे, राज वरे, सायली वरे, कॉ.अ‍ॅड.सुभाष लांडे, राम लांडे, बाबूलाल सय्यद, क्रांती मगर, शेखर तिजोरे, राजेंद्र दुसंग, प्रेम अंधारे, शरद म्हस्के, प्रीतम नाईक, सुनील आहुजा आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलकावर आम्ही शेवगावकर या लिखाणाचे आकर्षण होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.संजय नांगरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com