शेवगाव
शेवगाव
सार्वमत

शेतकर्‍यांचे जीवनमान लहरी मेघराजाच्या हाती

तालुक्यातील मोठे क्षेत्र पावसावरच अवलंबून

Arvind Arkhade

शेवगाव- खरीप हंगामाच्या सुरुवातीला हजेरी लावलेल्या पावसाने मध्यंतरी दडी मारल्याने पेरणी केलेले संकटात सापडले होते. त्यामुळे शेतकर्‍यांना धडकी भरली होती. मात्र तालुक्यात पुन्हा पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या जीवात जीव आला आहे. तालुक्यातील मोठे क्षेत्र पावसावरच अवलंबून असल्याने सर्वसामान्य शेतकर्‍यांचे जीवनमान या लहरी मेघराजाच्या हातातच आहे.

तालुक्यातील सर्वत्र पावसाचे प्रमाण सारखे नसल्याने काही ठिकाणी अद्याप पेरण्या चालू आहेत. तालुक्यात दुबार पेरणीचे आलेले संकट मागील दोन दिवसांत झालेल्या पावसाने टळले आहे. या खरिपात उस लागवडीसह 65 टक्के पेरा पूर्ण झाला आहे. मागील काही वर्षे कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी अधिक रोगराई आक्रमणाच्या फेर्‍यात सापडलेल्या शेतकर्‍यांनी पांढर्‍या सोन्याच्या मोहात न पडता इतर धान्यांच्या पेरणीला पसंती दिली आहे. कपाशीबरोबर तालुक्यात कांदा लागवडीकडेही शेतकरी वळाले होते. मात्र मागील काळात आर्थिक नुकसान झाल्याने तुरीकडे हमीभावामुळे शेतकरी वळाले आहेत.

शेतकर्‍यांनी तालुक्यात या खरीप हंगामात 83 हजार 652 हेक्टरपैकी 43 हजार 368 हेक्टर शेत जमिनीवर विविध बियाण्यांची पेरणी केली आहे. मागील काही वर्षे तालुक्यात 42 ते 50 हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड होत असे. तालुका कापसाचे आगर म्हणून ओळखला जाऊ लागला व तालुक्याचा आर्थिक विकास या पांढर्‍या सोन्याने केला. कोट्यवधी रुपयांची उलाढाल, जीनिंग व ऑईल मिलचे जाळे ही पांढर्‍या सोन्याचीच किमया आहे.

मात्र लहरी पर्जन्यमान, लाल्या, बोंडअळी, बाजारभाव यामुळे शेतकर्‍यांचा सुरुवातीची काही वर्षे धावणारा जीवनगाडा आर्थिक गाळात फसू लागला. यामुळे यावर्षी 28 हजार 588 हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झालेली आहे. बाजरी, कांदा पिकांचे क्षेत्र घटले आहे. याशिवाय बाजरी, मका, मूग, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, कारळ, उडीद यांचीही लागवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील सहा मंडलांत 216 ते 269 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. काल शहरटाकळी, भावीनिममगाव, दहिगावने येथे दोन तास पावसाने हजेरी लावली. परवा रात्री शेवगाव, फलकेवाडी, भगूर, अमरापूर, आव्हाणे परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. तर आखेगाव परिसरातील काही बंधारे भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पेरणीसाठी वापसा नाही तर काही ठिकाणी अद्याप शेतांतून पाणी बाहेर निघालेले नाही.

इतर ठिकाणीही काहा प्रमाणात पाऊस झाला. तालुक्याच्या काही गावांना वरदान असणार्‍या जायकवाडी धरणातही पाण्याची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे. जमिनीतील पाणी पातळी उंचावण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. यावर्षी करोनामुळे गावात थांबणार्‍या शेतकर्‍यांनी जास्त वेळ शेतात हजेरी लावून मशागत केली आहे. मात्र मेघराजाने साथ दिली तर करोना संकटकाळातही पीकपाणी चांगले येऊन सर्वसामान्य शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकतो.

तालुक्यात पावसाने हजेरी लावली व जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी शेवगाव शहरातील नागरिकांना 8-10 दिवसांनंतर एकदाच पाण्याचा पुरवठा होतो. शेवगावकरांसाठी पावसाळा व उन्हाळा सारखाच आहे. अनेक नागरिक छतांवरील पावसाचे पाणी साठवतात.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com