शेवगाव तालुक्यात लढाईपूर्व तयारीला वेग

राजळे, ढाकणे, काकडे तयारीत; घुले वेट अ‍ॅण्ड वॉचमध्ये
शेवगाव तालुक्यात लढाईपूर्व तयारीला वेग

शेवगाव | Shevgav

वधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अद्यापी वर्ष - दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. तरीही शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघात आगामी विधान सभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लढाईपुर्व हालचालींनी वेग घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी आ. राजळे, अ‍ॅड. ढाकणे, काकडे मैदान असल्याचे सुचीत करत आहेत. तर घुले यांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याची स्थिती आहे.

विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी राज्यात नुकतेच झालेले सत्तांतर आपल्या दृष्टीने फायद्याचे ठरल्याचे दाखवून देत शेवगाव - पाथर्डी तालुक्यात विविध प्रलंबित विकास कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव विकास निधी उपलब्ध करून घेत दोन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी विकास कामांच्या भूमिपूजन, उदघाटन कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी दोन्ही तालुक्यात संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

मतदार संघात राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षातील सरळ लढतीत जनशक्ती विकास आघाडीच्या माजी जिप सदस्या हर्षदा काकडे यांनी आपण सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून आगामी आमदारकीच्या स्पर्धेत रंगत वाढविलाी आहे. शेवगाव - पाथर्डी तालुका उस तोडणी कामगारांचा परिसर म्हणून राज्यात ओळखला जात असल्याने व त्यांची मते निर्यायक ठरत असल्याने हा मतदार ज्यांच्या पाठीशी तोच सिकंदर अशी येथील राजकीय परिस्थिती आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंढे यांची या मतदार संघाची घट्ट नाळ जोडलेली होती. परळी ही माझी आई तर पाथर्डी ही आपली मावशी असल्याचे ते सतत म्हणत असत. स्व. मुंढे यांना दैवत मानणारा या परिसरातील वंजारी समाज त्यांच्या पश्च्यातही माजी मंत्री पंकजा मुंढे यांच्या सोबत तेवढ्याच ताकतीने आजही उभा आहे. याचा अनुभव गेल्या विधान सभेच्या दोन्ही निवडणुकीत अनुभवयास आले आहे.

आमदार राजळे यांचा मतदार संघात असलेला जनसंपर्क भरीसभर त्यांची कार्यतत्परता व मतदार संघातील सध्याची परिस्थिती राजळे यांच्यासाठी अत्यंत सोयीची सुरळीत आणि अनकूल असल्याची त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात राजळे विरुद्ध ढाकणे अशीच लढत आज तरी गृहीत धरली जात आहे.

केदारेश्वर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अ‍ॅड.ढाकणे यांच्या पाठीशी जनतेने उभे राहण्याचे आवाहन करून त्यांच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीचे संकेत दिले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्‍यात त्यांना उमेदवारीचा शब्द देवून तयारीला लागण्याचे सूचित केल्याने त्यानी संवाद यात्रेच्या निमित्ताने मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

मात्र ढाकणे यांच्या या संवाद यात्रेत घुले समर्थकांची उपस्थिती सध्यातरी अभावानेच दिसून येत असल्याने तसेच अनेक घुले समर्थकांना त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याची माहिती काहींनी नाव न छापण्याच्या बोलीवर दिली. हर्षदा काकडे या जनशक्तीच्या माध्यमातून सातत्याने सामान्यांसाठी कार्यरत आहेत. त्यांचाही जनसंपर्क दांडगा असून आपणही या रेसमध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

एकंदरीत विधान सभेची निवडणूक अजून लांब असतांना शेवगाव - पाथर्डी मतदार संघात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीतील लढती बाबत लोक चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात विधान सभेची अंतिम लढत कशी रंगणार ? व त्यात कोण बाजी मारणार याबाबत कुतूहल तसेच उत्सुकता वाढली आहे.

सोयर्‍या धायर्‍यांची मदत

गेल्या दोन निवडणुकीत आ.राजळे यांना अनेक आव्हांनांचा सामना करावा लागला होता. ढाकणेंबरोबरच घुले यांच्याशीही झुंजावे लागले. मात्र सध्या ही परिस्थिती बदललेली आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंढे यांचे मोठे पाठबळ त्यांना आहे. याशिवाय गडाख- घुले सोयीरीकीने या मतदार संघात असलेला विरोध मवाळ होण्याची शक्यताही राजकीय जाणकारातून व्यक्त होत आहे. तसेच इतर पक्षातील सोयर्‍यांची अंतर्गत मदत त्यांना होत असल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com