शेवगावच्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी

लाठीचार्ज प्रकरण, वंचितचे पोलीस अधीक्षक ओला यांना निवेदन
शेवगावच्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगाव येथील हजरत सोनामिया यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 26) फुलांची चादर मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये विनाकारण लाठीचार्ज करून महिला, लहान मुले व तरुणांना जखमी करून जाणीवपूर्वक जातीय द्वेष निर्माण करणार्‍या शेवगावच्या पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्वरित निलंबित करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, वंचितचे शिष्टमंडळ व शेवगावच्या सकल मुस्लिम समाज यांनी केली आहे.

याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी प्यारेलाल शेख, फिरोज पठाण, ड. योगेश गुंजाळ, अन्सार भाई कुरेशी, जावेद शेख, अकील पठाण, अंजन चव्हाण, समीर शेख, राजेश बागवान, दानिश बागवान, गोडाजी चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी (दि.26) हजरत सोनामिया यात्रेनिमीत्त फुलांची चादर मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीची परवानगी शेवगाव पोलिस स्टेशन यांनी रात्री 10 वाजेपर्यंत दिली होती. परंतु आंबेडकर चौक ते शिवाजी चौक पर्यंत रात्री 9 वाजता मिरवणूक आली असता, शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे तेथे आले व त्यांनी मिरवणूक बंद करा असे सांगितले. मिरवणुकीमधील तरूणांनी त्यांना फक्त एक गाणे वाजवू द्या यानंतर मिरवणूक बंद होईल अशी विनवणी केली.

परंतु दोन मिनीटानंतर लगेच पुजारी यांनी आपल्यासोबत आणलेल्या पोलिस कर्मचारी व एसआरपी जवानांना विनाकारण लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. या लाठीचार्जमध्ये धावपळ उडून बहुतेक महिला, लहान मुले व वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले. याबाबत सर्व व्हिडीओ क्लिप सीसीटीव्ही फुटेज चेक करून शेवगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी व विनाकारण लाठी चार्ज करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्वरित विलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

चादर मिरवणुकीसाठी 10 वाजेपर्यंत परवानगी दिली असताना. पोलीस निरिक्षक पुजारी यांनी 9 वाजताच मिरवणूक अडवली. एका गाण्यानंतर मिरवणूक विसर्जीत करण्यास सर्वजण तयार असताना तसेच सर्व सहकार्य करत असताना पुजारी यांनी अचानक विनाकारण लाठीजार्च करायला लावला. ज्यात लहान मुले, महिला, वृद्ध जखमी झाले.

- प्यारेलाल शेख, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com