शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आ. राजळे समर्थकांवर अन्याय

कार्यकारिणीत डावलत एकाच गटाला झुकते माप दिल्याचा आरोप
आमदार मोनिका राजळे
आमदार मोनिका राजळे

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

भाजप पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची यादी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नुकतीच जाहीर केली. या नूतन कार्यकारीणीबाबत पडसाद शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांत उमटले आहेत. या नियुक्त्या करताना एकाच गटास झुकते माप देण्यात आले तर निष्ठावान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याच्या तक्रारी असून मतदारसंघातील विद्यमान आ. मोनिका राजळे यांच्या समर्थकांना डावलण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, याप्रकरणी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी कार्यकारीणीतील नूतन निवडीला स्थगिती देत विद्यमान लोकप्रतिनिधींसह दोन्ही तालुक्यातील पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून पुढील निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. येत्या 24 सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांच्या निवडीचा निर्णय सामोपचाराने घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आ. राजळे यांनी नेहमीच पक्षातील नव्या -जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याने पक्षाचे सर्व कार्यकर्ते आ. राजळे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षांसह पक्षश्रेष्ठींनी तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करताना विचारविनिमय करून योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष गंगाभाऊ खेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com