भाव घसरल्याने संतप्त शेतकर्‍यांनी बंद पाडले लिलाव

भाव घसरल्याने संतप्त शेतकर्‍यांनी बंद पाडले लिलाव

शेवगाव-पाथर्डी मार्गावर दोन तास रास्तारोको आंदोलन

शेवगाव |तालुका प्रतिनिधी|Shevgav

कांद्याचे लिलाव सुरु होताच भाव घसरल्याचे दिसताच संतापाचा पारा चढलेल्या शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे तक्रारी करत ते बंद केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनानंतर पुन्हा कांदयाचे लिलाव सुरु झाल्यावर 1 हजार 800 ते 2 हजार 750 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेवगाव बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शनिवारी 7 ते 8 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. सकाळी 12 वाजता कांदयाचे लिलाव सुरु झाले. पाथर्डी तालुक्यातील कांदा बाजार बंद आहे. यामुळे मढी परीसरातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात कांदा विक्रीसाठी येथे आणला होता. कांद्याची प्रतवारी पाहून लिलावात सुमारे 1 हजार 800 ते 2 हजार 750 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मात्र मढी येथील गजानन मरकड, महादेव मरकड अंबादास आरोळे, पोपट शेख, पप्पू पाखरे व इतर शेतकर्‍यांनी नगर येथील मार्केटप्रमाणे कांदयाला जास्त भाव मिळावा अशी मागणी करत कांदा मार्केट बंद पाडले. शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर येवून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार झाले नाहीत. शेवटी आंदोलनकर्त्यांतील अंबादास आरोळे यांना पोलीसांनी उचलून गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला. यावेळी प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, दादा पाचरणे, अमोल देवढे, मच्छिंद्र डाके आदी सहभागी झाले होते.

नगर, घोडेगाव, राहुरी, राहता येथे झालेले लिलाव व भावाची माहिती घेण्यात आल्यानंतर पुन्हा कांदयाचे लिलाव घेण्यात आले. त्यामध्ये चांगल्या प्रतीच्या कांदयाला 1 हजार 800 ते 2 हजार 750 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com