प्रभाग आरक्षीत झाल्याने मातब्बर धाब्यावर

शेवगाव नगरपरिषद : 21 पैकी 11 जागा सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव
प्रभाग आरक्षीत झाल्याने मातब्बर धाब्यावर

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगरपरिषदेच्या 21 प्रभागांची प्रभागनिहाय आरक्षण सोडत

शुक्रवारी (दि. 27) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, मुख्याधिकारी अंबादास गरकळ, नितीन बनसोडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. त्यामध्ये अनेक मातब्बरांचे प्रभाग आरक्षीत झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांना इतर प्रभागात धाव घ्यावी लागणार आहे. शेवगावात ‘कही खुशी, कही गम’ची स्थिती पहायला मिळत आहे.

सकाळी 11 वाजता साक्षी मुळे व सीफा शेख या दोन छोट्या मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी तीन प्रभाग, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सहा, सर्वसाधारण महिलेसाठी सहा व इतर सहा जागा या खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 21 पैकी 11 जागा या सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत.

पालिका निवडणुकीत 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत. मात्र नेहमीप्रमाणे आरक्षण सोडतीला एकही महिला उपस्थित राहिली नाही. सोडतीमध्ये अनेक इच्छुकांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने अडचण निर्माण झाली आहे. महिला आरक्षणामुळे इच्छुकांना आता आपल्या सौभाग्यवतीसाठी उमेदवारी मागावी लागणार आहे. काही कायमस्वरुपी हक्क दाखविणार्‍यांचे आरक्षण समजताच त्यांचे दाबे दणाणले आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे

- प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 11, 18 - खुला,

- प्रभाग क्रमांक 5, 6, 8, 10, 12, 15 सर्वसाधारण महिला,

- प्रभाग क्रमांक - 9 अनुसूचित जाती पुरुष,

- प्रभाग क्रमांक 19 व 21 अनुसूचित जाती महिला,

- प्रभाग क्रमांक 7, 14, 20 नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष,

- प्रभाग क्रमांक -13,16,17 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com