शेवगाव नगरपरिषदेसाठी मोठ्या पक्षांचा लागणार कस

लहान पक्षांची भूमिका निर्णायक
शेवगाव नगरपरिषदेसाठी मोठ्या पक्षांचा लागणार कस

शेवगाव | Shevgav

शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांनी जिंकण्यासाठी रणनिती सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अशा दोन मातब्बर राजकीय पक्षांचा मोठा कस लागणार आहे. तर इंदिराकाँग्रेस, शिवसेना, जनशक्ती विकास आघाडी, भाकप, वंचित बहुजन आघाडी, मनसे, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना व त्या पाठोपाठ आरक्षणाची सोडत पार पडली आहे. आता मतदार प्रारूप यादीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून चर्चा, बैठका आणि प्रभाग निहाय आराखड्याच्या तयारीला सर्वांनीच वेग दिला असून नगरपरिषदेची निवडणूक पावसाळा संपताच बहुदा सप्टेंबर अखेरीस अथवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ही निवडणूक भाजप व राष्ट्रवादी अशा दोन मातब्बर राजकीय पक्षात अतिशय चुरशीने व अटीतटीने रंगणार असल्याची चिन्हे असून इंदिरा काँग्रेस, शिवसेना, जनशक्ती विकास आघाडी, भाकप, वंचित बहुजन आघाडी, मनसे, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. सध्यातरी सर्वच राजकीय पक्षांनी नगरपरिषदेची ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर करून निवडणुकीतील रंगत वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शेवटच्या क्षणी कोण आणि कोणत्या पक्षाबरोबर अथवा संघटनेबरोबर युती अथवा आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मात्र राष्ट्रवादी व भाजप अशा दोघांच्याही कार्यकाळात जनतेच्या पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अशा मुलभूत समस्यांना मूर्तरूप देण्यात म्हणावे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येने आजही जटील रूप धारण केलेले असल्याने नगरपरिषदेपेक्षा पूर्वीची ग्रामपंचायत तरी बरी होती असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. सध्या नगरपरिषदेवर सत्तेचा झेंडा रोवण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपासह सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी प्रयत्न चालविले असले तरी जनता कुणाला कौल देणार? याबाबत उलट सुलट अंदाजांना व चर्चेला वेग आला आहे.

निवडणूक अजून लांब असली तरी विविध राजकीय पक्षांकडून सत्तेच्या झेंड्यासाठी आराखडा तयार करण्याला वेग आला असून आज तरी आगामी नगरपरिषदेची निवडणूक सर्वांच्याचदृष्टीने चर्चेचा विषय ठरू पाहत असून प्रभागांचा अभ्यास आणि जुळवा जुळवीची लगबग यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

असे बलाबल

नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने 9, भाजपने 8 तर अपक्ष 4 अशा जागा जिंकल्या होत्या. यावेळी अपक्षां पैकी तिघांनी राष्ट्रवादीला समर्थन दिल्याने. राष्ट्रवादीच्याविद्या अरुण लांडे यांनी नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून बहुमान पटकावला होता. परंतु पुढील अडीच वर्षाच्या टप्यात राष्ट्रवादी व अपक्षांपैकी काहींनी भाजपची साथ धरल्याने नगरपरिषदेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकून राणी विनायक मोहिते या नगराध्यक्ष पदावर आरूढ झाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com