शेवगाव शहरात महावितरणची बत्ती गूल

वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले
शेवगाव शहरात महावितरणची बत्ती गूल

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शहरात विजेचा लपंडाव ही नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार होणार्‍या विजेच्या लपंडावामुळे सर्वसामान्य व्यावसायिक, नागरिक त्रासले असले तरी त्याकडे महावितरणकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील विजेच्या समस्यांवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोणी पुढाकार घेणार आहे की नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देणार्‍या महावितरणची सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याची जबाबदारी नाही का ? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

विजेवर चालणारे छोटे, मोठे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. पीठाची गिरणी, फेब्रिकेशन, झेरॉक्स अशा प्रकारचे विविध व्यवसाय करून उपजीविका भागवतात. या प्रकारामुळे व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आज प्रत्येक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालतात. शाळा-महाविद्यालये, बँका, किराणा दुकाने, मेडिकल्स, महाई-सेवा केंद्रे, शासकीय कार्यालये अशा सर्वच ठिकाणी होणारे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतात.

यासाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, बॅटरी यांसारखी किमती उपकरणे वापरली जातात. शेवगाव शहरातील काही भागात विद्युत प्रवाहातील कमी उच्च दाब तसेच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ही उपकरणे नादुरुस्त होऊन व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. तसेच सेवेत खंड पडल्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

नेहमीप्रमाणे वरूनच बिघाड

तालुक्याचे ठिकाण म्हणून शेवगावच्या बाजारपेठ खरेदीसाठी व शासकीय कामानिमित्त सतत रेलचेल असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत विविध कारणांनी विजेचा लपंडाव सुरू आहे. विशेष म्हणजे, वारा अथवा पाऊस नसतानाही वीज गूल होत आहे. नागरिकांनी महावितरणकडे चौकशी केल्यानंतर वरूनच बिघाड आहे, असे सांगून निरुत्तर केले जाते.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित महावितरण प्रशासनाची कारणेही नित्याचीच झाली आहेत. संपर्क साधला तरी वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे, पूर्ववत होण्याचा कालावधी आदी माहिती वीज ग्राहकांना मिळत नाही. एरवी वीज देयक वेळेत न भरल्यास तात्काळ दाखल होणारे महावितरणचे अधिकारी, ग्राहकांच्या या समस्येवर कोणती हालचाल करतात, याचीही नागरिकांना प्रतिक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com