शेवगावच्या बाजारपेठेत बैलपोळ्याच्या खरेदीची लगबग

पावसामुळे सुखावलेला बळीराजा सनासाठी सज्ज
शेवगावच्या बाजारपेठेत बैलपोळ्याच्या खरेदीची लगबग

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव व परिसरात साजरा होणारा श्रावणी बैल पोळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने आज शेवगावच्या आठवडे बाजारात पोळ्याच्या साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची मोठी लगबग चालू होती.

गेल्या दोन वर्षात पोळ्याच्या सणावर करोना महामारीचे सावट होते. ते आता उठले, त्यातच चालू वर्षी पाऊस पाणी समाधानकारक झाल्याने पोळा साजरा करण्याचा शेतकर्‍यांचा उत्साह वाढला आहे. या परिसरात श्रावणी पोळा मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याचा प्रघात आहे. यासाठी शेवगावात मध्यवस्तीत 1912 पासून पोळा मैदान राखून ठेवलेले आहे. या मैदानावर अनेक जण टपर्‍या मधून व्यवसाय करतात. मात्र पोळ्याच्या अगोदर सर्व व्यवसायिक आपण होऊन पोळ्यासाठी टपर्‍या हटवून मैदान मोकळे करून देतात.

या मैदानावर शेवगाव परिसरातील पशुपालक आपले पशुधन सजवून सवाद्य मिरवणुकीने आणतात. नगरपरिषदेच्या वतीने उत्कृष्ट पशुची निवड करून त्यांचे मालकाचा यथोचित सन्मान करण्यात येतो. शेवगावामध्ये पोळ्याच्या निमित्ताने नारळाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. प्रत्येक शेतकरी आपल्या प्रत्येक जनावरांसाठी, प्रत्येक शेतातील व गावातील देवादिकांसाठी मिळवून डझनाने नारळ घेत असतो.

त्यामुळे येथे कीमान दोन लाख नारळाची आवक होत असते. अलीकडे बहुतेक शेतकर्‍यांनी आपल्या वस्ती सभोवती व शेतीच्या बांधावर नारळाची झाडे लावली आहेत. त्यामुळे नारळाची आवक थोडी कमी झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. पशुधन सजविण्यासाठी शिंदोरी, वेसन कासरा, घुंगर माळा, शेंब्या, पितळीतोडे, गोंडे, हिंगुळ घेतले जाते.

साहित्याच्या किंमतीत वाढ

कच्च्या मालाची भाव वाढ व मजुरी वाढल्याने पितळी वाणाची शंभर रुपये किलो मागे दरवाढ झाली आहे. हौशी पशुपालक आपल्या जनावरांसाठी बाराशे ते तीन हजार रुपये किमतीच्या झुली घेतात. यंदा तयार मालाला शेतकर्‍यांची मागणी आहे. कापसाला भाव वाढल्याने यंदा सुताचे भाव वधारले. सणासाठी लागणार्‍या हरभरा डाळ , गुळाचे भाव सारखेच असले तरी नारळाचे भाव 16 ते 20 रुपये नग आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com