शेवगाव तालुक्याला लम्पी प्रतिबंधक लसीचे 41 हजार डोस उपलब्ध

शेवगाव तालुक्याला लम्पी प्रतिबंधक लसीचे 41 हजार डोस उपलब्ध

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुका पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील गाय वर्गातील सर्वच्या सर्व 71 हजार पशुधनावर लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे शनिवारी उपलब्ध झालेल्या 30 हजार लसीच्या ढोससह आत्ता पर्यंत संबधित लसीचे 41 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. तर दिवसाअखेर 6 हजार जनावरांना लसीकरण झाले आहे.

शेवगावसह तालुक्यात भातकुडगाव, शहरटाकळी, वरूर, हसनापूर, कांबी, बोधेगाव परिसरातील शोभानगर, अशा एकूण 6 ठिकाणच्या परिसरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चारुदत्त असलकर यांनी दिली. तालुक्यातील हसनापूर येथील श्रीधर शंकर धायगुडे या शेतकर्‍याच्या बैलामध्ये जनावरांच्या लंपी चर्मरोगाची काही लक्षणे आढळून आल्याने तालुक्यात लंपी सदृश्य आजाराच्या पशुधनाची संख्या सहा पर्यंत जावून पोहचली आहे.

तालुक्यात लंपी सदृश्य सहाजनावरांपैकी भातकुडगाव येथील 2 व शहरटाकळी येथील 1 अशी 3 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. हसनापूर परिसरात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लसीकरण , मोहीम सुरु केली असून काल रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही तालुक्यात 6 हजार 146 जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत.

शेवगाव तालुक्यात लंपी सदृश्य आजाराची लक्षणे आढळलेल्या जनावरांची संख्या जरी वाढत असली तरी आतापर्यंत तालुक्यात कोणत्याही प्रकारची जनावरांची मरतुक झालेली नाही. जनावरांवर वेळीच उपचार होतील यासाठी शेतकरी पशुपालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी डोके, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.असलकर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com