शेवगाव तालुक्यातील 79 गावांत 56 हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र

कृषी विभागाची हंगामपूर्व तयारी पूर्ण : समाधानकारक पावसाच्या अंदाजामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साह
शेवगाव तालुक्यातील 79 गावांत 56 हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. तालुक्यात 112 गावांपैकी 79 गावांतील 56 हजार हेक्टरवर खरीप पेरणी होणार आहे. यासाठी कृषी विभागाने हंगाम पूर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग या सर्वाधिक घेतल्या जाणार्‍या पिकांसाठी बियाणे, खते, संभाव्य कीड व रोग या अनुषंगाने लागणारी औषधे शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे.

तालुक्यातील वहिती खालील 94 हजार 118 हेक्टर क्षेत्रापैकी 56 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे आहे. त्यामध्ये सर्वाधिक कपाशीच्या पिकाची सरासरी 42 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यामुळे तालुक्यात कपाशीच्या बियाणांची व त्यानुषंगाने लागणार्‍या खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. शेतकर्‍यांना काही ठराविक कंपन्यांचे वाण दोन-तीन वर्षांपासून पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने ते काळ्या बाजारातून मिळेल त्या किमतीला खरेदी करण्याची वेळ येते. मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने खतांसाठीही पहाटेपासून दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकर्‍यांमध्ये खरीप हंगामासाठी उत्साह आहे.

कृषी विभागाने त्यानुषंगाने 747 कपाशी, 260 बाजरी, तूर 714, मका 80, उडीद 45, भुईमूग 250, सोयाबीन 63 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली आहे. तर खतांसाठी 16 हजार 778 मेट्रीक टनाची मागणी तालुक्यासाठी नोंदवली आहे. तालुक्यातील 109 रासायनिक खत विक्रेते, 134 अधिकृत बियाणे, किटकनाशके व औषधे विक्री केंद्रामार्फत ती शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तालुक्यातील देवटाकळी, ठाकूर निमगाव, खडके, सुलतानपूर खुर्द व पिंगेवाडी या पाच गावांत एक गाव एक वाण या अंतर्गत कपाशीच्या ठराविक वाणाची लागवड करण्यासाठी संबंधित उत्पादन कंपनी व दुकानदार यांच्या मार्फत शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

असे आहे खरिपाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कपाशी 42 हजार, तूर 8 हजार 500, बाजरी 6 हजार 500, मका 400, मूग 700, उडीद 300, भुईमूग 500, सोयाबीन -280.

शेतकर्‍यांनी माती परीक्षण करून जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करावे. तसेच स्वत:कडील बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. कपाशीवरील सेंद्रीय बोंडअळी नियंत्रणासाठी 31 मे पूर्वी लागवड करू नये. आवश्यक त्या पीक वाणांची व बियाण्यांची खरेदी करताना दुकान दाराने छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत लावल्यास किंवा इतर बियाणांची सक्ती करण्यात येत असल्यास शेतकर्‍यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

- किरण मोरे, तालुका कृषी अधिकारी शेवगाव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com