शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील अनेक गोरगरिबांची विविध प्रकरणे दोन वर्षांपासून लाल फितीत अडकून पडली आहेत.

शासनाच्या सर्व शासकीय समित्या कार्यरत नसल्याने तहसील कार्यालयातील संबंधित विभागाचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. यामुळे गोरगरीब नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 8 दिवसांत हा प्रश्न सुटला नाही तर आमदारांच्या घरासमोर महामुक्काम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव अॅड. सुभाष लांडे यांनी दिला.

शेवगाव येथे सोमवारी (दि. 22) तहसील कार्यालयासमोर शेवगाव-नगर रस्त्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने विविध प्रश्नांसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज बील वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी.

तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना जाहीर व मंजूर केलेले अनुदान त्वरीत देण्यात यावे, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना, शेतमजूर पेन्शन योजना तसेच विविध प्रकारच्या अनुदान योजनांसाठी दोन वर्षांपासून दाखल प्रकरणे मार्गी लावून गरजू लाभार्थ्यांना अनुदान सुरू करावे.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीला आळा घालून वाढलेले दर कमी करा, आदी मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. येत्या 8 दिवसांत हे प्रश्न न सुटल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही अॅड. लांडे व संजय नांगरे यांनी दिला. नायब तहसीलदार रमेश काथवटे यांनी निवेदन स्विकारले.

या आंदोलनात संजय नांगरे, कृष्णनाथ पवार, बापूराव राशिनकर, अशोक नजन, आत्माराम देवढे, भगवान गायकवाड, वैभव शिंदे, गहिनीनाथ आव्हाड, विश्वास हिवाळे, रत्नाकर मगर, लक्ष्मण आव्हाड, यशवंत आव्हाड, म्हातारदेव खेडकर, प्रभाकर पोळ, फुलाबाई काळपुंड, शिला रणमले, कौसाबाई बोरुडे, शकुंतला आव्हाड, बबनबाई शिरसाठ आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.