शेवगावच्या पूर्व भागात पुन्हा अतिवृष्टी

नद्या, नाल्यांना पूर, पिके भुईसपाट
शेवगावच्या पूर्व भागात पुन्हा अतिवृष्टी

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुसर्‍यांदा शनिवारी रात्री पुन्हा जोरदारपणे ढगफुटी सदृश झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुधडी वाहून आलेल्या पुरामुळे खरीप हंगामागील उरलेसुरले कापूस,बाजरी, तूर, व उभे ऊस पीक भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे तर जनजीवन विस्कळीत होऊन रस्त्याची दैन्य अवस्था निर्माण झाली आहे

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी,चापडगाव, हातगाव, कांबी, हसनापूर, शिंगोरी, नागलवाडी, गोळेगावं, लाडजळगाव, आदी भागात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश पावसाने जोरदार हजेरी लावली रात्रभर व रविवारी पहाटेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता तर झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन छोटे- मोठे, तलाव नद्या नाले दुथडी वाहून अनेक नद्यांना पूर आले तर शेत जमिनीत सर्वत्र पाणी साचून तळ्यासारखे स्वरूप निर्माण झाले आहे तर तालुक्यातील खरीप हंगामातील पिके कमीअधिक पावसामुळे जोरात आली होती.

मात्र गेल्या महिन्यापासून वादळी वार्‍यासह सततच्या जोराच्या पावसामुळे मुख्य असलेले कापूस, बाजरी, उडीद, सोयाबीन, तूर व शेतात उभे असलेले ऊस पीक पूर्णपणे भुईसपाट होऊन शेतात लोळले गेले आहेत, शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊन शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, जोरदारपणे झालेल्या पावसामुळे जुनी लाकडी माळवद घरे गळू लागली आहेत, काही ठिकाणी पडझड झाल्याच्या तक्रारी आहेत.

शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील बोधेगाव येथे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक सकाळपर्यंत बंद झाली होती तसेच तालुक्यात खरीप पिकाचे अतोनात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना अडचणीत दिलासा देण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांतून व्यक्त व्यक्त होत आहे.

ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने खरिपातील पीके जमीनदोस्त झाली आहेत. दहा-पंधरा दिवसांपासून सतत झालेल्या पावसामुळे पिकात पाणी साठल्याने पीक सडून जळून गेले आहे त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे तर इतर पिके भुईसपाट झाली असल्याने नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा.

- एकनाथ कसाळ, शेतकरी, अंतरवाली खुर्द

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com