
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यातील 34 गावांची खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली आहे. यात ही आणेवारी ती 50 पेक्षा जास्त असल्याने शेतकर्यातून संतप्त भावना व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावात मागील ऑगस्ट व यंदाच्या सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकरी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असतानाही ही पैसेवारी 50 पेक्षा जास्त लावण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून संबधितांनी कोणत्या आधारावर ही पैसेवारी लावली असा सवाल? उपस्थित केला आहे.
तालुक्यात 30 व 31 ऑगस्ट व तालुक्याच्या पूर्व भागातील हातगाव, कांबीसह अनेक गावात 4 व 5 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील काही गावे खरीपाची असतांना तेथेही वाढीव पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा तालुक्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यानंतर पावसात खंड होत राहिला. त्यानंतर शेतकर्यावर अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचे संकट ओढवले. पैसेवारी लावलेल्या काही गावात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. येथील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून सरकारला नुकसानीचा अहवालही सादर करण्यात आला आहे.
निर्सगाच्या अवकृपेमुळे खरीप पिकाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीमुळे शेतकर्यांचा धीर खचला आहे. त्यामुळे संबधितांनी प्रत्यक्ष पाहणी करून यापैसेवारीत बदल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या भागात अजूनही फिरकलेले नाहीत. त्यामुळे पालक मंत्र्यांना शेतकर्यांच्या दु:खाचे काहीच देणेघेणे दिसत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून तालुक्यात जाहीर झालेली 34 गावांची नजर पैसेवारी शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणार्या पद्धतीची असल्याने याबाबत योग्य तो बदल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
तालुक्यात खरीप हंगामाची जाहीर झालेली नजर अंदाज आणेवारी पुढील प्रमाणे- अंतरवाली खुर्द व शे, बाडगव्हाण, चेडेचांदगाव (60 पैसे), आधोडी, अंतरवाली बु, बेलगाव , गोळेगाव, कोनोशी, राक्षी, सोनेसांगवी, शिंगोरी, शोभानगर, सुकळी, वरखेड (65पैसे), दिवटे, लाडजळगाव, नागलवाडी, सुळेपिंपळगाव, शेकटे बु (66 पैसे), बोधेगाव, मुरमी, शेकटे खुर्द, सेवानगर, राणेगाव (67 पैसे), कोळगाव, मंगरूळ खुर्द, सालवडगाव, ठाकूरनिमगाव (69 पैसे), हसनापूर, मंगरूळ बु, नजीक बाभूळगाव, थाटे (70 पैसे), माळेगाव ने, वाडगाव (71 पैसे) अशी आहे.