शेवगाव-गेवराई महामार्गावर वंचितचा रास्तारोको

पंढरपूर पालखीमार्ग भू संपादीत शेतकर्‍यांना मोबदला देण्याची मागणी
शेवगाव-गेवराई महामार्गावर वंचितचा रास्तारोको

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

पंढरपूर पालखी मार्गावरील जमीन संपादित शेतकर्‍यांना मोबदला मिळण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, मुंगी, हातगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द, या गावातून पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे गेल्या पाच सहा वर्षांपासून काम सुरू आहे परंतु रस्त्यासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकर्‍यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी काम बंद पाडले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकारी प्रशासनला हाती घेऊन कामात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत मुस्कटदाबी केली जात आहे.

अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांची मिलिभगत असून या प्रश्नावर कोणी बोलत नाही असा आरोप आंदोलकानी केला. या अन्याच्या विरोधात बोधेगाव, हातगाव, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, मुंगी, भागातील संतप्त शेतकर्‍यांनी जमीनधारक शेतकर्‍यांना मोबदला मिळावा, अशी प्रमुख मागणी यावेळी लावून धरण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हातगाव फाटा याठिकाणी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. परंतु या आंदोलस्थळी कोणीही जबाबदार अधिकार्‍यांनी भेट न दिल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र होऊन मोठ्या प्रमाणात याठिकाणी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली होती.

या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, बन्नोभाई शेख, प्यारेलाल शेख, माजी सरपंच रामजी अंधारे, अशोक लाड, डॉ.निलेश मंत्री, धोंडीराम मासळकर, अरविंद सोनटक्के, आदित्य मोरे, गंगाभीषण घोरतळे, फारूक सय्यद, चाँद शेख, बबन सय्यद, कारभारी नरोटे, किशोर मातंग, ईश्वर मोरे, राजेंद्र बनसोडे, अरविंद सोनटक्के, निलेश ढाकणे, गौतम भोंगळे, यांच्यासह भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यमान लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांचा धिक्कार आंदोलकांनी केला आहे.

प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

संबंधित शेतकर्‍यांचा भू संपादन मोबदल्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास 26 जानेवारी रोजी शेतकर्‍यांसह शेवगाव-गेवराई या महामार्गावर असणार्‍या हातगाव फाटा याठिकाणी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com