..त्या पुराच्या आठवणीने आजही होतो काळजाचा थरकाप

वर्षपुर्ती होऊनही भरपाईपासून बहूतांश शेतकरी वंचितच
..त्या पुराच्या आठवणीने आजही होतो काळजाचा थरकाप

अहमदनगर|शेवगाव |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगाव तालुक्यातील नदिकाठच्या गावांसाठी 31 ऑगस्टची सकाळ पुराचे संकट घेऊनच उगली. सकाळी 7 वाजेच्या सुमारास धडकेलेल्या पुराच्या लोंढ्यांने क्षणात होत्याचे नव्हते केले. घरे पाण्याखाली गेली. पशुधन डोळ्यांसमोर वाहुन गेले, काही बुडून तडफडून मेले. अन्नधान्य, घरातील भांडीकुंडी वाहुन गेली. कुटुंबियांचे जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर, झाडांवर बसून संपुर्ण दिवस काढला. त्या दिवसाची आठवण झाली तरी अजूनही जीवाचा थरकाप उडतो अशा प्रतिक्रिया कराड वस्ती, वरूर, भगुर येथील नागरीकांनी सार्वमतशी बोलतान व्यक्त केल्या.

बरोबर वर्षभरापुर्वी 30 ऑगस्टला रात्री पाथर्डी तालुक्यातील डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदणी, चांदणी, भागीरथी व ढोरा या नद्यांमधून हे सर्व पाणी 31 ऑगस्टला पुराच्या लोंढ्यासह भल्या सकाळी शेवगाव तालुक्यातील नदीकाठची गावे बुडवतच धरणाकडे झेपावले. शेवगावच्या पश्चिम भागात धरणाचा फुगवटा असल्याने हे पाणी नदीचे पात्र सोडून गावे, शेतांमध्ये घुसले.

अनेक ठिकाणी नदी पाळीपासून तीस ते चाळीस फुटांपेक्षा उंंच पाणी होते. अनेक घरे पाण्याखाली गेली. पशुधन, संसार उपयोगी साहित्य, विहिरींची तसेच घराची पडझड, दुकानातील साहित्य वाहून गेले. सर्व परिसरातील पिके अनेक दिवस पाण्यात होती. त्यावर गाळ साचून संपुर्ण नुकसान झाले होते. तालुक्यातील आखेगाव तिर्तफा, डोंगर आखेगाव, खरडगाव वरूर बु, वरूर खुर्द, भगूर, वडुले बु, शेवगाव, जोहरापूर आदी 10 गावात परिसरात पुराचा तडाका बसला.

यापैकी शेती पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम काही प्रमाणात संबधित शेतकर्‍यांना मिळाली आहे. अनेक शेतकरी आजही पिकांच्या नुकसानीपासून वंचित आहेत. मात्र या घटनेतील पशुधन, घरांची पडझड, संसार उपयोगी साहित्य, कोंड्या, शेळी, मेंढी यासह वाहून गेलेल्या विविध नुकसानीची नुकसान भरपाई अजूनही संबधितांना मिळालेली नाही. भरपाई केव्हा मिळणार? असा सवाल पुरग्रस्त नागरीक उपस्थित करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com