शेवगावमध्ये खतांसाठी शेतकर्‍यांच्या रांगा
सार्वमत

शेवगावमध्ये खतांसाठी शेतकर्‍यांच्या रांगा

Arvind Arkhade

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav

शहरासह तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कृषिसेवा केंद्रांसमोर खते घेण्यासाठी शेतकर्‍यांनी रांगा लावल्या आहेत. तालुका कृषी कार्यालयाने खताच्या वाटपाचे योग्य नियोजन न केल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी थेट तालुका कृषी कार्यालयात तोडफोड करण्याचा इशारा शेवगाव तालुका कृषी अधिकार्‍यांना दिला होता. जिल्हा प्रशासनासही रांधवणे यांनी संपर्क करत शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी युरियासह अन्य खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्याची मागणी केली होती. खत टंचाईची दखल जिल्हा प्रशासनाने घेत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खते उपलब्ध करून दिली आहेत.आजपासून जवळपास सर्वच कृषी सेवा केंद्रांत युरियासह अन्य खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

मागील वर्षी पावसाने दांडी मारल्याने तसेच करोना महामारीचे संकट यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील सर्व मंडलांत सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुका कृषी कार्यालयाने मात्र योग्य नियोजन न केल्याने तालुक्यात युरियासह अन्य खतांचा तुटवडा निर्माण झालेला होता. यामुळे शहरातील व तालुक्यातील सर्वच कृषिसेवा केंद्रासमोर रांगा लागलेल्या आहेत. यामुळे सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे या सर्व गोष्टीचा फज्जा उडाला आहे. यात कृषिसेवा केंद्र चालकांना देखील फटका बसला आहे.

शेवगाव नगरपरिषदेने याबाबत कारवाई करत कृषिसेवा केंद्र चालकांना दंड आकारला आहे; परंतु योग्य नियोजन न केल्याने ही गर्दी वाढतच चाललेली आहे. शेतकरी ही आपल्याला युरियासह अन्य खते मिळतील की नाही, या विवंचनेत सापडलेला आहे. यावर योग्य नियोजन करावे, अशी मागणी करत मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष रांधवणे यांनी तालुका कृषी कार्यालयातील अधिकार्‍यांना काही सूचना करत याबाबत योग्य नियोजन करण्याचे सुचविले आहे.

आलेली युरियासह अन्य सर्व खते शेतकर्‍यांना मुबलक स्वरूपात वाटप करावीत, अशी मागणी करत शेवगाव शहरातील विविध कृषिसेवा केंद्राच्या गोडाऊनवर जात स्वतः व कृषी सहायकांना सोबत घेऊन शिल्लक खते व युरियाचे शेतकर्‍यांना वाटप केले.

Deshdoot
www.deshdoot.com