
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तब्बल दीड महिन्यांपासून शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके अडचणीत सापडली आहेत. शेतकर्यांनी पावसाच्या भरवशावर जूनमध्येच कपाशी, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांची लागवड केली मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे शेतकर्यांनी पाऊस पडेल या आशेवर खरीप पेरण्या केल्या. खतांचे डोस दिले फवारणी, खुरपणी केली मात्र यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वच पिकांची वाढ खुंटली असून पावसाअभावी पिके सुकून चालल्याने झालेला खर्च तरी निघेल का ? या चिंतेने शेतकरी भयभीत झाला आहे.
सध्या कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांदा अनुदान अजूनही प्रतीक्षेत आहे. गेल्या वर्षीची अतिवृष्टीची मदतही अद्यापही शेतकर्यांना मिळाली नाही.शासनाच्या सुलतानी धोरणामुळे व आता निसर्गाच्या फटक्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांनी खरिपासाठी उधार उसनवारी करून महागमोलाचे बियाणे मातीत गाडले, त्यावर खत टाकण्याचे धाडसही दाखवले परंतु दुर्दैवाने यंदाच्या पावसाळ्यात वरूणराजाने पाठ फिरवल्याने तसेच यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा पावसाची आणि शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहे.
तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 600 मी.मी असून तालुक्यात आज अखेर केवळ 216 मी. मी वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या इनमीन 36 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील एरंडगाव ढोरजळगाव मंडलात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्या परिसरातील खरीप पिके धोक्यात आल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. तालुक्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र 84 हजार 979 हेक्टर असून यंदाच्या हंगामात उद्दिष्ट क्षेत्राच्या सुमारे 120% पेरण्या झाल्या आहेत.
तालुक्यात कपाशी 46 हजार 671 हेक्टर, तूर 9 हजार236 हेक्टर, बाजरी 1 हजार 759 हेक्टर, सोयाबीन 1 हजार 427 ,मूग 386, भुईमूग 268, कांदा 260 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. तालुक्यात कोठेही पाऊस नाही आता पाऊस झाला तरी उत्पादनात वाढ होणार नाही अशीच शेतकर्यांची भावना बनली आहे. एकंदरित तालुक्यात पाऊस नसल्याने महाग मोलाचा खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुष्काळी मदत देण्याची मागणी
ज्या मंडळांमध्ये आणेवारी 50 टक्केपेक्षा कमी लागते त्या ठिकाणी दुष्काळी उपायोजना सुरू होतात. यामध्ये शेतकर्यांच्या मुलांची फी माफ करणे, पिकविमा रक्कम देणे यासह शेतकर्यांना विविध सवलती देण्यात येतात. या दुष्काळी उपायोजना सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.