शेवगाव 10 दिवसांसाठी लॉकडाऊन
सार्वमत

शेवगाव 10 दिवसांसाठी लॉकडाऊन

12 करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

Arvind Arkhade

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav

तालुक्यात शनिवारी (दि. 18) 12 करोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून त्यात शहरातील 7 तर मुंगी येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार 18 ते मंगळवार 28 जुलै असे 10 दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचा आदेश तहसीलदार अर्चना पागिरे यांनी काढला आहे.

शहरातील मारवाडगल्ली व गांधी पुतळ्याजवळ करोना बाधित आढळल्यानंतर शनिवारी पुन्हा शहरात 7 करोना बाधित आढळले आहेत. तसेच मुंगी येथे आढळलेल्या करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या 5 जणांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरात मागील दोन-तीन दिवसांत सापडलेले 5 तर यापूर्वी निंबे नांदूर येथे सापडलेल्यांपैकी 2 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या तालुक्यातील करोना बाधित रुग्ण संख्या 19 आहे. तालुक्यात आतापर्यंत 40 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 21 बरे झाले आहेत.

शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने मेडिकल, दवाखाने याच अत्यावश्यक सुरू राहणार राहणार आहेत. करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क वापरावा, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली तर ही साखळी थांबू शकते. येत्या 10 दिवस नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेऊन घरातच राहण्याचे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे.

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नायब तहसीलदार मयूर बेरड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ, आरोग्य विभाग व त्यांची टीम करोना काळात एकत्रित काम करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com