शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स पोलीस प्रशासनाने रात्रीतून हटविले. त्यामुळे शहरातील विविध चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. तर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
फ्लेक्समुळे शहराचे होणारे विद्रुपीकरणही थांबले असून यापुढेही अनधिकृतबाबत पोलीस प्रशासन तसेच नगरपरिषदेने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक, खरेदी विक्री संघ इमारत, सिद्धीविनायक मनोकामना गणपती मंदिर परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगे बाबा चौक, मिरी रोड, नेवासा रोड, लोकनेते गोपीनाथ मुंढे चौक आदींसह विविध चौकात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लागले होते.
फ्लेक्स लावण्याच्या चढाओढीत शहराचे विद्रुपीकरण सुरु असल्याच्या तक्रारी होत्या. तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून शहरातील विविध चौकांतील अनधिकृत फ्लेक्स काढून घेणे बाबत पोलीस प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले होते.
यानंतर अनेकांनी आपले फ्लेक्स काढूनही घेतले. मात्र त्यानंतर उभे असलेले काही फ्लेक्स काढून घेण्याची कारवाई पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्सपैकी काही फ्लेक्स परवानगीने लावण्यात आले असले तरी अनधिकृत फ्लेक्सची संख्या मोठी होती. त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेचा महसूलही बुडत आला आहे. याबाबत ठाम भूमिका घेतल्यास शहरातील विविध चौकांचा श्वास मोकळा होऊन रहदारीचा मार्ग खुला होणार असल्याने याबाबत संबंधितांनी निदान यापुढे तरी सजग राहणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
ठोस भूमिकेची गरज
या अनधिकृत फ्लेक्स बाबत नगरपरिषदेकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने दिवसेंदिवस अनधिकृत फ्लेक्सची संख्या वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे. अनधिकृत फ्लेक्स बाबत पोलीस प्रशासन व नगरपरिषदेने ठोस भूमिका घेऊन अनधिकृत फ्लेक्स लावणार्यांवर दंडासह कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.