शेवगाव : साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

शेवगाव : साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

शेवगाव (शहर प्रतिनिधी)

शेवगाव तालुक्यात ६ हजार ४५ हेक्टर क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात आक्टोंबर अखेरीपर्यंत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. तर तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

सततच्या पावसामुळे यंदाही शेतक-याच्या विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेती व शेतक-यांचे अर्थकारण अडचणीत सापडले आहे. विविध ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेले असल्याने यंदाचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असून सध्या तालुक्यात रब्बी पेरण्यांना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, बटाटा, उस, आदी पिके घेतली जातात. मात्र शेतातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतक-यांना त्यांच्या शेतात मशागत करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी पेरण्या लांबल्या आहेत. आधीच खरीप हंगाम वाया गेला. त्यात रब्बीही लांबणीवर पडणार असल्याने शेतक-यांसमोर विविध अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. शेतक-यांना मोफत बियाणे खाते वाटप करावेत तसेच रब्बी हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध व्हावे अशी मागणी शेतक-यातून होत आहे.

तालुक्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (उसाशिवाय ) ८४ हजार ५३५ हेक्टर असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात येत असले तरी गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील शेतक-यांचा कपाशीकडे कल वाढला आहे. तालुक्यात कपाशीची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड शेवगाव तालुक्यात होते. एकंदरीत कपाशी उत्पादनात शेवगाव तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामाच्या सरासरी क्षेत्रात झालेला मोठा बदल लक्षात घेता कृषी विभागाने खरीप व रब्बीच्या सरासरी क्षेत्रात योग्य तो बदल करून त्या प्रमाणे शेतक-यांना शासनाच्या विविध सोयी सवलतीचा लाभ मिळेल या पद्धतीने सकारात्मक निर्णय घेण्याची ही मागणी शेतक-यातून होत आहे.

तालुक्यात रब्बीच्या झालेल्या पिक पेरणीची माहिती पुढील प्रमाणे

गहू १ हजार ५२७ हेक्टर, रब्बी ज्वारी १ हजार १५७ हेक्टर , मका १३७, हरभरा २ हजार १६१. करडई १, मका ३८७, ज्वारी / कडवळ २३८, लुसरसर्न ग्रास ३१८, उस १००, नेपिअर ग्रास १७६, कांदा ५३३, बटाटा / टोमाटो प्रत्येकी ७, भाजीपाला २३४

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com