शेवगाव : कोव्हिड सेंटरच्या मदतीसाठी सरसावले प्राथमिक शिक्षक

एका दिवसात जमा केला सव्वा लाखांचा निधी
शेवगाव : कोव्हिड सेंटरच्या मदतीसाठी सरसावले प्राथमिक शिक्षक

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) -

शेवगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी कोव्हिड केअर सेंटरची

चांगलीच मदत होत आहे. या सेंटरला मदत करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मदतीने एकाच दिवसात सुमारे एक लाख 25 हजार रुपयांचा मदत निधी जमा केला.

शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मागील वर्षभरापासून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा सकारात्मक वापर करत आहेत. याच ग्रुपच्या माध्यमातून या शिक्षकांनी गुरुवारी शेवगावच्या कोव्हिड केअर सेंटरच्या मदतीसाठी दिवसभरात सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा केला. तालुका प्रशासनाने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात 150 बेडचे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरू केले आहे.

येथे मूलभूत व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची अडचण असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके व नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी केले होते. या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. एका दिवसातच 140 प्राथमिक शिक्षकांनी गुरुवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एक लाख 25 हजार रुपयांचा निधी जमा केला. तालुक्यात 750 प्राथमिक शिक्षक आहेत. तीन ते चार दिवसांत किमान एकूण 500 ते 600 प्राथमिक शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार व त्यापुढे अशी स्वेच्छेने मदत गोळा करण्याचा संकल्प शिक्षकांनी केला आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता या पुढील काळात संभाव्य वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोव्हिड सेंटरमधील बेडची संख्या व सुविधा वाढविण्याची गरज आहे. तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत करावी. शिक्षकांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.

- शैलजा राऊळ, नोडल अधिकारी, कोव्हिड सेंटर, शेवगाव

सामाजिक कार्यकर्तेही मदतीसाठी सरसावले

भक्ती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल मालुसरे यांनी स्वत:च्या मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 21 हजार रुपये, व्यंकटेश उद्योग समुहाचे अनिल गुंजाळ यांनी 11 हजार रुपये, जनशक्ती मंचचे शहराध्यक्ष सुनील काकडे यांनी 11 हजार रुपये, कुलदीप फडके यांनी 11 हजार रुपये, सचिन लांडे, अतुल लांडे, प्रविण भारस्कर यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये अशी सुमारे 70 हजार रुपयांची रक्कम गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांच्याकडे सुपूर्द केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com