शेवगाव पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई गजाआड
सार्वमत

शेवगाव पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई गजाआड

25 हजारांची लाच मागितली होती

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर। प्रतिनिधी। Ahmednagar

तपास कामामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रूपयांची लाच मागणी करणार्‍या पोलीस शिपाई विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सोमनाथ आसाराम सोनटक्के (वय- 32 रा. शेवगाव) असे या पोलीस शिपाईचे नाव आहे. तो शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली. सोनटक्के याला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

शेवगाव तालुक्यातील तक्रारदार यांच्या मुलाच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या मुलास जामीन मिळावा व तपासात मदत करण्यासाठी साहेबांना सांगतो असे म्हणून त्याच्या मोबदल्यात साहेबांसाठी पोलीस शिपाई सोनटक्के याने तक्रारदार यांच्याकडे 24 जुलै रोजी पंचासमक्ष 25 हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. याप्रकरणी शुक्रवारी लाचलुचपत पथकाने सोनटक्के याच्याविरूद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या पथकाने केली.

Deshdoot
www.deshdoot.com