शेंडीत लालपरी आडवत विद्यार्थ्यांचे आंदोलन

शेंडीत लालपरी आडवत विद्यार्थ्यांचे आंदोलन

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणुन प्रख्यात असणार्‍या भंडारदरा धरणाच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धडपड करत असुन शिक्षणासाठी ग्रामिण भागातून शाळा-महाविद्यालयात येताना कोणतेही वाहन नसल्याकारणाने शेंडी येथे विद्यार्थ्यांनी लालपरीलाच आडवे होत आंदोलन केले.

भंडारदरा धरणाचा पाणलोट व परिसर आदिवासी भाग म्हणुन ओळखला जातो. बदलत्या युगानुसार आदिवासी विद्यार्थ्यांमध्येही शिक्षणाच्या गंगोत्रीची क्रांती दिसुन येत असल्यामुळे आदिवासी विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात येताना दिसून येत आहे. पंरतु या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील तसेच परिसरातील अनेक विद्यार्थी शेंडी या ठिकाणी शाळा व कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यामध्ये रतनवाडी, वारंघुशी, बारी, लाडगाव, शेणीत, घाटघर अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरुन विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये येत असतात.

पंरतु या मार्गावर अकोले आगाराच्या गाड्यांचे धावण्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. घाटघर व रतनवाडी येथील विद्यार्थ्यांना सकाळी येण्यासाठी लालपरी जरी उपलब्ध असली तरी घरी परतण्यासाठी संध्याकाळच्या मुक्कामाच्या गाडीशिवाय पर्याय नसतो. तर मान्हेरे, लाडगाव, शेणीत या भागात येण्यासाठी व जाण्यासाठी गाडीच उपलब्ध नाही, परिणामी या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाचा प्रवास करत, गाडीला लटकत शालेय शिक्षण घ्यावे लागत आहे. शेंडी येथील अकोले एज्युकेशनच्या उच्च माध्यमिक विद्यालयाने अकोले आगाराला निवेदन देऊनही आगारप्रमुखांनी मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे.

त्यामुळे शेंडी येथे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अकोले आगाराच्या लालपरीला आडवत निदर्शने करत आमच्या शिक्षणासाठी बसेस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. जर अकोले आगाराने आमच्या मागणीचा तात्काळ विचार केला नाही तर कोल्हार-घोटी राज्यमार्गावर जोपर्यंत गाड्या उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आदिवासी पाड्यावर राहुन शिक्षण घेताना अतिशय कसरत करावी लागत असून चार पाच कि. मी. पायी येऊन रतनवाडीत सकाळी सहा वाजता बस पकडावी लागते. तर कॉलेज सुटल्यावर गाडी नसल्याने उपाशी पोटीच संध्याकाळपर्यंत गाडीची वाट पाहावी लागते. जर अकोले आगाराने आमच्या मागणीचा विचार केला नाही तर निश्चितच आम्ही आंदोलनाचा मार्ग स्विकारु.

- किशोर झडे, रतनवाडी

शेंडी येथील माध्यमिक विद्यालयात 40 ते 50 कि. मी. विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून त्यांना परतीच्या मार्गासाठी वाहने किंवा बस उपलब्ध होत नाही. अकोले आगार प्रमुखांना वेळोवेळी निवेदने देऊनही उपयोग होत नाही. अकोले आगाराने आतातरी जागे होवून दि. 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या दिवसापासून तरी आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची ससेहोलपट थांबवावी.

- महेश पाडेकर, वर्गशिक्षक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com