शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीचा ‘ट्रेड’

जिल्ह्यातील सहा जणांना एक कोटी 16 लाखांना गंडा
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीचा ‘ट्रेड’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर बाजारात गुंतवणुकीचे पेव फुटलं आहे. काही जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळाले देखील आहेत. पण काही लोकांनी शेअर मार्केटचा अभ्यास न करता, जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडले आणि आपली ऑनलाईन फसवणूक करून घेतली. चालू वर्षात जिल्ह्यातील सहा जणांना एक कोटी 16 लाख 97 हजार 943 रूपयांना गंडा घातला आहे. येथील सायबर पोलीस ठाण्यात गेल्या नऊ महिन्यात सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

शेअर मार्केटचा अभ्यास न करता आणि अति विश्वास ठेवला तर गुंतवलेल्या पैशाची फसवणूक होतेय हे अनेकवेळा आपण पाहतोय. शेअर मार्केटमध्ये फसवणूकीसाठी अनेक कंपन्या व त्यांचे एंजट आहेत. यातील काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जादा टक्केवारीच्या आमिषासह अनेक प्रलोभने दाखवली आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. योग्य पध्दतीने अभ्यास करून गुंतवणूक करून शेअर मार्केट मधून चांगला पैसा, परतावा देखील मिळतोय हे ही तितकंच खरं आहे. परंतू त्याचा अभ्यास नसल्यास समोरच्या व्यक्तीच्या आमिषाला आपण बळी पडतो आणि फसतो.

शेअर बाजारातील गुंतवणुकीत पूर्वी केवळ श्रीमंत, व्यापारी हेच दिसायचे. आता मात्र हे चित्र बदलले असून सर्वसामान्य नागरिकांचा शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे ओढा वाढला आहे. परंतू याबाबत पुरेसे ज्ञान नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक आणि त्यावर चांगला परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक होते. नगर जिल्ह्यातही अशा घटना घडत आहे. चालू वर्षात आतापर्यंत सायबर पोलिसांत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये तब्बल 50 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. दुसर्‍या एका व्यक्तीची 37 लाखांची फसवणूक झाली आहे. 16.51 लाख, 7.19 लाख, 4.89 लाख, 75 हजार अशी रक्कमेची फसवणूक झाली आहे. संबंधीत व्यक्तींनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. शेअर मार्केटमध्ये ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रकमेची गुंतवणूक करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने गुंतवणूकदारही धास्तावले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com