के.के.रेंजप्रश्नी पुढील आठवड्यात शरद पवार संरक्षण मंत्र्यांच्या भेटीला

आ. निलेश लंके : शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची पवार यांची ग्वाही
के.के.रेंजप्रश्नी पुढील आठवड्यात शरद पवार संरक्षण मंत्र्यांच्या भेटीला

पारनेर |प्रतिनिधी| Parner

राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांत के.के. रेंज विस्तारीकरणासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत.

यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. यासाठी सर्व गावकरी एकवटले असून या पार्श्वभूमीवर आ. निलेश लंके यांनी काल (बुधवारी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर पुढील आठवड्यात या प्रश्नावर केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेेणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याची माहिती आ. लंके यांनी दिली.

या भेटी दरम्यान आ. लंके यांनी पारनेर तालुक्यासह नगर आणि राहुरी तालुक्यातील स्थानिक शेतकर्‍यांची भूमिका पवार यांच्यासमोर विषद केली. त्यावर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्यातील आघाडी सरकार हे शेतकर्‍यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही दिली. जिल्ह्यातील राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी संरक्षण खात्याने ताब्यात घेतलेल्या आहेत.

यापुढील काळात सुमारे 25 हजार हेक्टर भूसंपादन करून विस्तारीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या याला राहुरी तालुक्यातील 17, नगर तालुक्यातील 5 व पारनेर तालुक्यातील 5 गावांनी विरोध केला आहे. या विस्तारीकरणामुळे ही 27 गावे बाधित होणार असल्याने या अन्यायकारक भूसंपादनाला विरोध करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील खारेकर्जुने परिसरात लष्कराचे के. के. रेंज हे सराव क्षेत्र आहे. तेथे सैनिकांना रणगाडा प्रशिक्षण दिले जाते. नगर, पारनेर व राहुरी या तिन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या क्षेत्राचे विस्तारीकरण होणार आहे. मात्र, या विस्तारी करणामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होणार आहे. यात विस्तारिकरणासाठी नव्याने केल्या जाणार्‍या या भूसंपादनाला तीव्र विरोध आहे.

पारनेर-नगरचे राष्ट्रवादीचे आ. लंके यांच्या नेतृत्वाखाली या विरोधात लढा उभारण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खा. शरद पवार यांना साकडे घालण्यात आलेले आहे. काल आ.लंके यांनी या प्रश्नावर पुन्हा मुंबई येथे पवार यांची भेट घेतली. के.के. रेंज विस्तारी करणासाठी विरोध असताना संरक्षण विभागाकडून सुरू असलेल्या हालचालीमुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे त्यांनी खा. पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, याप्रश्नी मी शेतकर्‍यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू असा शब्द पवार यांनी दिला आहे. पुढील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही खा. पवार यांनी आ. लंके यांना दिली. यावेळी वनकुटेचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, युवा नेते विजू औटी, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, सुनील कोकरे उपस्थित होते.

खा. पवार यांच्या भेटीनंतर आ. लंके यांनी स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध असतानाही के.के. रेंज विस्तारी करणासाठी जमीन संपादनाचा घाट घालण्यात आलेला आहे. ही बाब शेतकर्‍यांवर अन्याय करणारी आहे. त्याअनुषंगाने आम्ही या देशाचे नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे. याबाबत संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संबंधितांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com