शरद सुद्रिक
शरद सुद्रिक
सार्वमत

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुद्रिक, उपाध्यक्ष शिरसाठ

चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झाली.

Nilesh Jadhav

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. यात चेअरमनपदी शरद सुद्रिक (कर्जत) यांची तर व्हाईस चेअरमनपदी अर्जुन शिरसाठ (पाथर्डी) यांची निवड करण्यात आली.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया शनिवारी जिल्हा निबंधक (सहकार विभाग) कार्यालयातील सभागृहामध्ये झाली. बँकेच्या चेअरमनपदी कर्जत येथील ज्येष्ठ संचालक शरद श्यामराव सुद्रिक यांची तर व्हाईस चेअरमनपदी पाथर्डी येथील अर्जुन भागिनाथ शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली.

जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर निवडणूक निर्णय अधिकारी होते. यावेळी बँकेचे सर्व संचालक हजर होते. सुद्रिक यांच्या नावाची सूचना मावळते उपाध्यक्ष नानासाहेब बडाख यांनी मांडली. शिरसाठ यांच्या नावाची सूचना संचालक बाळासाहेब मुखेकर यांनी केली. बँकेतील सत्ताधारी गुरुमाउली मंडळाच्या धोरणानुसार शिक्षक बँकेचे चेअरमन दुसुंगे व व्हाईस चेअरमन बडाख यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली होती.

यावेळी गुरुमाउली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, दत्ता कुलट, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, राजकुमार साळवे, मच्छिंद्र लोखंडे, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख, साहेबराव अनाप, विद्याताई आढाव, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब तापकीर, राजकुमार साळवे, राम निकम, अविनाश निंभोरे, सुरेश निवडुंगे, नारायण पिसे, आर. टी. साबळे, भाऊराव राहिंज आदी उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाउली मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शिक्षक बँकेत सत्ताधारी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे हे अध्यक्ष आहेत. यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळात दोन गट असल्याचा दावा विरोधक करीत होते. मात्र, कालच्या निवडीत बँकेच्या सर्व संचालकांनी एकमुखी अध्यक्ष तांबे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या आदेशानुसार निवडी बिनविरोध केल्या.

गुरुमाउली मंडळात सामान्य असणारे, शिक्षक संघटनांच्या राजकारणात कोणताही वारसा नसताना शिक्षक बँकेत शरद सुद्रिक आणि अर्जुन शिरसाठ यांना पद मिळाले आहे. यापूर्वी द्विव्यांग असणारे साहेबराव अनाप आणि संतोष दुसुंगे यांना संधी देण्यात आली होती. यामुळे गुरुमाऊली मंडळातील सामान्य व्यक्तीला मोठे करण्याची परंपरा अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी कायम ठेवली असल्याचे मानले जाते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com