अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका पर्यटन मॉडेल होऊ शकतो. सह्याद्रीचा हा भाग निसर्गसंपन्न आहे. योग्य प्रकारच्या सुविधा दिल्या तर येथे बदल झाल्याशिवाय राहणार नाही

मात्र पर्यटन विकास करताना येथील स्थानिकांंना, विशेषत: तरुणांना दुर्लक्षित करून चालणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. यशवंतराव भांगरे यांच्यारूपाने एका कर्तृत्ववान माणसाचा पुतळा उभा राहिला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले

माजी आमदार कै. यशवंतराव भांगरे यांच्या शेंडी (भंडारदरा) येथील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. व्यासपीठावर आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, आमदार डॉ.किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, प्राचार्य रमेशचंद्र खांडगे,ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, दिलीपराव शिंदे, आबासाहेव थोरात, अविनाश आदिक, रावसाहेब म्हस्के, अरुण कडू, अशोकराव भांगरे, मधुकरराव नवले, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मिनानाथ पांडे, भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, सुरेश गडाख, अमित नाईकवाडी, ऍड. संघराज रुपवते, मिलिंद गायकवाड, दिलीप भांगरे, अमित भांगरे , शरद कोंडार, शारदा लगड, सुनिता भांगरे, उत्कर्षा रुपवते, स्वाती शेणकर आदी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, अकोले तालुक्यात ज्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. त्यात सुरुवातीला अगस्ति कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था अशी विकासाची दालने सुरू झाली. त्यामध्ये यशवंतराव भांगरे यांचे मोलाचे योगदान राहिले. जुन्या जाणत्या माणसांच्या पुतळ्याचे अनावरणाचे भाग्य मला लाभले.सामजिक मूल्य यांची जपवणूक करणारे यशवंतराव भांगरे होते.तोच विकासाचा व सांस्कृतिक वसा घेऊन भांगरे कुटुंब काम करत आहे. गोपळराव भांगरे यांच्यापासून विकासाचे राजकारण सुरू झाले, ते आजतागायत सुरू आहे.

माझ्या साक्षीने अकोले तालुक्यात विकास कामे करण्याचा शब्द दिला आहे, तो शब्द पाळावा, जेथे अडचण येईल तेथे मला सांगावे असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भाषणाचा धागा पकडत पवार म्हणाले. अकोले तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

तालुक्यतील रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी व पर्यटन विकास करण्यासाठी भरघोस मदत करू, असे अध्यक्षीय भाषणात ना. हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तालुक्यतील बंद असलेल्या उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू कराव्यात व पर्यटन विकासासाठी चालना द्यावी, अशी मागणी अशोकराव भांगरे यांनी केली. यावेळी आ.लहामटे, अमित भांगरे यांची भाषणे झाली. स्वागत आणि प्रास्ताविक विनोद हांडे यांनी केले. आभार शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी मानले.

पवारांची आठवण

रंधा धबधबा पहाण्यासाठी आलो, तेव्हा मी लोणी येथे 9 वीत शिकत होतो. माझे बंधू तेथे नोकरीस होते. एका सुट्टीच्या दिवशी लोणी ते रंधा असा सायकलवर आलो होतो, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.