
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महायुतीच्यावतीने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार अथवा राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा सामान्य चेहर्याला संधी देऊन त्यांच्या मागे आ. पवार, आ. तनपुरे यांच्यासह पक्षाने ताकद उभी करावी, अशी एकमुखी मागणी गुरुवारी मुंबईत झालेल्या आढावा बैठक करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधील शरद पवार गटाच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची काल मुंबईत राष्ट्रवादी भवनमध्ये आढावा बैठक पार पडली. बैठकीला स्वत: शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ.अनिल देशमुख, आ.जितेंद्र आव्हाड, जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. राहुल जगताप, दादा कळमकर, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, राष्ट्रवादीचे नूतन प्रतोद संदीप वर्पे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, प्रताप ढाकणे, प्रकाश पोटे, अनिल आठरे, नामदेव पवार, रोहिदास कर्डिले, शौकत तांबोळी, अभिषेक कळमकर, राहुरी, नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष आणि सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी भवनमध्ये दुपारी एक वाजता बैठकीला सुरूवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रस्ताविक केले. यात फळके यांनी 2004 मध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमदेवार विजयी झाला होता. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सातत्याने या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमदेवार स्वत:च्या विधानसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने पिछाडीवर असल्याचे फाळके यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच येणार्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नगर लोकसभा जिंकावयाची असल्यास एक तर सामान्य चेहरा अथवा आ. रोहित पवार अथवा आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या तोलामोलाच्या उमेदवाराची गरज असल्याचे स्पष्ट केले.
फाळके यांच्या भाषणातील संभाव्य उमेदवारांचा धागा पकडून त्यानंतर प्रताप ढाकणे, राहुल जगताप, अरूण कडू, दादा कळकर, अभिषेक कळमकर यांनी आपल्या मनोगतात ही मागणी लावून धरली. तसेच आ. पवार अथवा आ. तनपुरे हे लोकसभा लढणार नसल्यास सामान्य चेहर्याला संधी देवून त्यांच्या निवडणुकीचा खर्च बड्या नेत्यांनी उचलावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाने संधी दिल्यास स्वत: फाळके, ढाकणे अथवा दादा कळमकर हे उमेदवारी करू शकतात, असा सूर यावेळी आवळण्यात आला. नगर लोकसभा मतदारसंघात महाआघाडी- राष्ट्रवादीला चांगले वातावरण असून पक्षाने योग्य उमेदवार दिल्यास याठिकाणी भाजपच्या विखे यांचा पराभव करता येणे शक्य असल्याचा विश्वास यावेळी शरद पवार यांना देण्यात आला. आढावा बैठकीत पवार यांनी शांतपणे उपस्थितीतांची मनोगत एकून घेतले, तसेच स्पष्ट भाष्य करणे टाळले असले तरी कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याची सुचना केली. नगर लोकसभा राष्ट्रवादी लढवणार आहे, त्यासाठी आतापासून कामाला लागा, राष्ट्रवादी आपल्या दारी उपक्रम लोकांपर्यंत पोहचवा, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. साधारणपणे दिवाळीनंतर राष्ट्रवादीचा नगर लोकसभेचा उमेदवार जाहीर होवू शकतो, अंदाज बैठकीनंतर वर्तवण्यात आला. यामुळे आता नगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या तिकीटवर महाआघाडीकडून आ. रोहित पवार की आ. प्राजक्त तनपुरे यापैकी कोण उमेदवार असणार यासाठी वाट पाहवी लागणार आहे.
विखे विरुद्ध पवार ?
कालच्या मुंबईतील बैठकीनंतर येणार्या लोकसभा निवडणुकीत खरोखर खा. विखे आणि आ. रोहित पवार यांच्यात लढत झाल्यास ही लढत रंगतदार होवू शकते. तसेच झाल्यास नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघातून आ. पवार यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आढावा बैठकीत पक्षाच्या दक्षिणेतील अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्यासमोर मनोगत व्यक्त केले. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघासाठी विखे आणि पवार या दोन राजकीय घराण्यासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
राणीताई लंकेच्या नावाचे बॅनर
सध्या नवरात्र सुरु असल्यामुळे नगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवीकडे जाणार्या महिला भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी अनेक नेत्यांचे बॅनर या रस्त्यांच्या कडेला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचा फोटो असलेला बॅनर देखील पाहायला मिळाला. त्यातच राणीताई लंके यांचे पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी या तालुक्यांमध्ये दौरे वाढल्याचे सांगण्यात येतय. त्यामुळे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आ. लंके यांची पत्नी राणीताई लंके या खा.डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आलंय.
लपूनछपून भेट नको !
पारनेरचे आ. नीलेश लंके येणार्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार होते. मात्र, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आ. लंके हे अजित पवार गटासोबत गेले. मात्र, ते आजही आपल्या सोबत असून शरद पवार यांना मानतात, यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबा तरटे यांनी केली. त्यावर आर्श्चय चकीत झालेल्या शरद पवार यांनी आ. लंकेबाबत संभ्रम दूर करावा, अशा सुचना दिल्या. तर आ. जयंत पाटील यांनी आ. लंके यांना दसर्यापर्यंत संधी आहे. त्यांनी दसर्यापर्यंत शरद पवार यांची भेट घेवून जाहीरपणे भूमिका स्पष्ट करावी. लपूनछपून भेट घेवू नयेत, तरच शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी त्यांचा विचार होवू शकतो, असे आ. पाटील यांनी जाहीर केले.